
एकीकडे राज्यातील सर्वच तलाव वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाले असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्व जेल आणि सुधारगृहे कैद्यांनी खचाखच भरली आहेत. सर्वच तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याने जागा मिळवण्यासाठी कैद्यांमध्येच शाब्दिक अथवा शारीरिक युद्ध रंगत आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, तसेच १७२ उपकारागृहे असून सर्वच दुपटीपेक्षा जास्त क्षमतेने तुडुंब भरली आहेत. त्यामुळेच तुरुंग अधिकाऱ्यांना जेलमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. कारागृह विभागाकडे महिलांसाठी पुणे आणि मुंबई येथे दोन वेगवेगळी कारागृहे असून महिलांसाठी पुणे आणि अकोला येथे दोन खुली कारागृहे, तसेच बालसुधारगृह आणि कारागृह रुग्णालय आहेत.
मुंबईतील आर्थर रोड आणि ठाण्यातील सेंट्रल जेलमध्ये सर्वाधिक कैदी आहेत. “ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर बहुतेक कैद्यांना या दोन कारागृहांमध्ये ठेवण्यात येते. त्यांना सुनावणीसाठी कोर्टात ने-आण करणे सोपे जावे म्हणून पोलीस अधिकाऱ्यांची याच दोन कारागृहांना पसंती असते. कल्याण आणि तळोजा ही दोन कारागृहे मुंबईपासून लांब असल्यामुळे कैद्यांना बाहेर काढणे खूपच धोकादायक असते,” असे आर्थर रोड कारागृहातील अधीक्षकांकडून सांगण्यात आले.
कोरोनाकाळात राज्यातील सर्व कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या ३७ हजार इतकी होती; मात्र केंद्र सरकारने कोविड नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर हा आकडा ४२ हजारांच्या पुढे गेला. “क्षयरोग, ताप आणि कोविड यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव कारागृहामध्ये झटक्यात होत असतो. स्वच्छतेचा अभाव, सामाजिक अंतराचे भान आणि क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे त्वचाजन्य तसेच बुरशीजन्य रोगाचे प्रमाणही कैद्यांमध्ये जास्त असते,” असे आरोग्यतज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्व कारागृहांची अधिकृत क्षमता २४ हजार ७२२ इतकी असली तरी सद्य:स्थितीत सर्व तुरुंगांमध्ये जवळपास ४२ बजार ७२७ कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहेत. यात ४१,००७ पुरुष, १७०७ महिला आणि १३ तृतीयपंथी यांचा समावेश आहे.
आर्थर रोड कारागृहाची क्षमता
८०४ असताना ३,५३० कैदी ठेवण्यात
आले आहेत.
ठाण्यातील सेंट्रल जेलमध्ये ४,२४५ कैदी असून क्षमता १,१०५ इतकीच आहे.
येरवडा जेलची क्षमता २,४४९ असून
७,०२७ कैदी शिक्षा भोगत आहेत.
कल्याणच्या सेंट्रल जेलमध्ये २,१०७ कैदी असून क्षमता ५४० इतकी आहे.
तळोजा जेलची क्षमता २,१२४ असून
३,३३२ कैदी ठेवण्यात आले आहेत.
नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये १,८४० क्षमतेपेक्षा ३,०५५ कैदी कोंबण्यात आले आहेत.
भायखळा महिला कारागृहात ३६६ कैदी असून क्षमता २६२ इतकी आहे.
अमरावती सेंट्रल जेलची क्षमता ९७३ असून १,५०० कैदी शिक्षा भोगत आहेत.
कोल्हापूर सेंट्रल जेलमध्ये २,२१० कैदी असून क्षमता १,७८९ इतकी आहे