काँटे की टक्कर

मुंबई महापालिकेत २५ वर्षें ठाकरेंच्या शिवसेनेने राज्य केले. २५ वर्षांत भाजपही शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा उपभोग घेत होती.
काँटे की टक्कर
Published on

- गिरीश चित्रे

महापालिका दर्पण

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग अखेर फुंकले. आचारसंहिता लागू झाली. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक काँग्रेस, तर एक भाजप यांच्यातील यंदाच्या निवडणुकीचा सामना चांगलाच रंगणार आहे. केंद्रातील सत्ता काबीज करणे भाजपसाठी मोठे चॅलेंज नसले तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मतदारराजाला भावनिक साद घालण्यात येईल, तर ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेत २५ वर्षांत कशी लूट केली, हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुख्य शस्त्र असणार आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी आरोप-प्रत्यारोप मुंबई महापालिकेच्या नावाखाली होणार. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी ‘काँटे की टक्कर’ असणार आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर. मुंबईत टाचणी पडली तरी त्याची चर्चा जगभर होते. त्यात अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. लोकसभा निवडणूक जाहीर होताच इच्छुक, उमेदवारी मिळालेल्यांनी आपल्या क्षेत्रात मोर्चेबांधणी सुरू केली. केंद्रातील सत्ता काबीज करणे हे भाजपचे प्रमुख लक्ष्य असले तरी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर भाजपसह सर्वंच पक्षांनी आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप अन् घोषणांचा वर्षाव होणारच. आम्हीच जनतेचे कैवारी असा सूर लोकसभा निवडणुकीत सर्वंच पक्ष आळवणार. केंद्रातील गड राखण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेने २५ वर्षांत मुंबई महापालिकेत सत्तेचा कसा गैरवापर केला, याचा लेखाजोखा मांडणार आणि आम्ही कसे जनतेचे वाली हे भासवणार, यात दुमत नाही. तर भाजपने २५ वर्षांत मुंबई महापालिकेत काय केले, केंद्रातील सत्तेचा उपभोग घेत भाजपने कशी अरेरावी केली, फोडाफोडीचे राजकारण, ईडी, सीबीआय असे भावनिक मुद्दे उपस्थित करत ठाकरेंची शिवसेना मतदार राजाला साद घालणार. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी 'कांटे की टक्कर' असली तरी मतदार राजासाठी ही निवडणूक पुढील अस्तित्व टिकवण्याची असणार आहे.

५९,९५४ कोटींचा अर्थसंकल्प, विविध बँकांमध्ये ८४ हजार कोटींच्या ठेवी म्हणजेच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पालिका म्हणजे मुंबई महापालिका. मुंबई महापालिकेत २५ वर्षें ठाकरेंच्या शिवसेनेने राज्य केले. २५ वर्षांत भाजपही शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा उपभोग घेत होती. मात्र २०१९ मध्ये खुर्चीचा वाद झाला अन् दोन मित्र पक्ष आज राजकीय शत्रू झाले आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांनी स्वतःची शिवसेना स्थापन करत भाजपच्या कमळाला साथ दिली. त्यामुळे भाजपचा विश्वास वाढला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला संपुष्टात आणायचे हेच भाजपचे मुख्य लक्ष्य, त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारात मुंबई महापालिकेतील काम, घोटाळे याची चिरफाड करत भाजप ठाकरेंवर टीकेची तोफ डागणार. निवडणूक लोकसभेची असली तरी मुंबई, ठाणे, कल्याण या मतदारसंघात मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या कामांची, भ्रष्टाचाराची पोलखोल करत भाजप राजकीय पोळी भाजून घेणार हेही तितकेच खरे.

मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन चिखलफेक तर होणारच. राज्यात भाजप, शिंदे व अजित पवार यांची सत्ता आहे. आता मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करायची आणि शिवसेनेचे अस्तित्व मिटवायचे ही भाजपची रणनीती असल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांची बंडाळी शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील सत्तेतून पायउतार करणारी ठरते का हे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. परंतु लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या बरोबरीने ठाकरेंवर टीकास्त्र सोडत मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या नावावर आरोप-प्रत्यारोप होणार हेही तितकेच खरे.

अजित पवार अन् एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेत फारसे वजन नाही. भाजप अन् ठाकरेंचे अस्तित्व आहे, परंतु निवडणुकीत कोणाचा विजय अन् कोणाचा पराजय हे भाग्य मतदारराजा लिहितो. लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री भाजप नेत्यांना आहे, परंतु मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करणे हे भाजपसाठी आव्हान ठरणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारात भाजप पूर्ण ताकदीनिशी ठाकरेंवर हल्लाबोल करणार आणि मुंबई महापालिकेच्या नावावर मतांचं राजकारण करणार यात दुमत नसावे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्वपक्षीय नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीत एकमेकांची पोलखोल करणार. आम्ही हे केलं आम्ही ते केलं अशी ओरड करणार, मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी केलेली ही घोषणा म्हणजे निवडणुकीचा जागर अन् विकासाची ओरड ही मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी केलेली घोषणा हे न समजण्या इतका मतदारराजा अज्ञानी नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in