शिंदे गटातच ‘गद्दारीचे’ आरोप-प्रत्यारोप गजानन किर्तीकर-रामदास कदमांमध्ये जुंपली

गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, अशी टीका कीर्तिकरांनी केली आहे.
शिंदे गटातच ‘गद्दारीचे’ आरोप-प्रत्यारोप
गजानन किर्तीकर-रामदास कदमांमध्ये जुंपली

मुंबई : एकीकडे बंडखोर एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर विरोधकांकडून गद्दार म्हणून टीका होत असतानाच, खुद्द शिंदे गटातील नेत्यांमध्येच आता एकमेकांवर ‘गद्दारी’च्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदासंघावरून खासदार गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात जोरदार जुंपली आहे. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा थेट हल्लाबोल रामदास कदम यांनी गजानन किर्तीकरांवर केल्यामुळे किर्तीकरांनीही त्याला पत्रकाद्वारेच चोख प्रत्युत्तर दिले आहे. गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, अशी टीका कीर्तिकरांनी केली आहे.

एका वृत्तपत्रात रामदास कदम यांनी किर्तीकर यांच्यावर पक्षगद्दारीचा आरोप केल्यामुळे किर्तीकर यांनी शनिवारी पत्रकाद्वारेच कदम यांच्या गद्दारीचा लेखाजोखाच मांडला. “रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. १९९० साली मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले. मी १० हजार मताधिक्यांनी विजयी झालो,” असे किर्तीकर यांनी सांगितले.

“खेड-भरणा नाका ते भोर-पुणे प्रवासादरम्यान शरद पवार यांच्‍या गाडीत बसून रामदास कदम राष्‍ट्रवादीत प्रवेश करण्‍याबाबत सविस्‍तर चर्चा करीत होते, हे त्‍यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील हे विसरलेले नाहीत. एवढेच कशाला कांदिवली पूर्व महानगरपालिकेच्‍या वॉर्डामधून त्‍यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढत असताना, त्यांना निवडून आणू नका म्‍हणून सर्व कार्यकर्त्‍यांना रामदास कदम हे दमबाजी करत होते,” असा गौप्यस्फोटही किर्तीकरांनी केला आहे.

“अनंत गीते यांनादेखील २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत पाडण्‍यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनत घेतली. परंतु, कोकणातील निष्‍ठावान शिवसैनिक गीतेंच्‍या पाठीशी उभे राहिल्यामुळे प्रचंड मताधिक्‍याने ते विजयी झाले,” असेही किर्तीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

वैफल्यग्रस्त कदमांची आदळआपट

कदम यांचा मुलगा सिद्धेश याला लोकसभा निवडणूक लढवण्‍याची इच्‍छा झाली आहे, म्‍हणून ते विविध मार्गांनी खोट्या बातम्‍या वृत्‍तपत्र व सोशल मीडियावर प्रसारित करून वातावरण गढूळ करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. त्‍यांच्‍या या दबावतंत्राला एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत. वैफल्यग्रस्‍त झाल्यामुळेच रामदास कदम आदळआपट करत आहेत. कदमांनी संभ्रम निर्माण करण्‍याचे निष्‍पळ प्रयत्‍न थांबवावेत,” असा इशारा किर्तीकर यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in