कथित खिचडी घोटाळा प्रकरण : सूरज चव्हाणाच्या ईडी कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ

कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली.
कथित खिचडी घोटाळा प्रकरण : सूरज चव्हाणाच्या ईडी कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ

मुंबई : कथित खिचडी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेला आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ईडीच्या विनंतीनंतर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी देशपांडे यांनी २५ जानेवारीपर्यंत सूरजला ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान, ईडीच्या अटकेच्या कारवाईविरोधात चच्हाण यांच्या वतीने ॲड. हर्षद भडभडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी २९ जानेवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. अमोल किर्तीकर यांच्या खात्यात ५२ लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याचे उघड झाल्यानंतर ईडीकडून सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची ईडी कोठडीत रवानगी केली होती. ती मुदत सोमवारी संपल्याने सूरज च्हाण यांना न्यायाधीश एम. जी देशपांडे यांच्यासमोर न्यायालयात हजर करण्यात आले. याचवेळी ईडीच्या वतीने ॲड. सुनील गोन्सालवीस यांनी आणखी आठ दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी दिली.

दरम्यान, चव्हाण यांच्यावतीने ॲड. हर्षद भडभडे यांनी ईडीच्या अटकेच्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र कनिष्ट न्यायालयाने तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावल्याने ईडीच्या रिमांड अर्जाची प्रत याचिकेत समाविष्ट करण्यासाठी ॲड. भडभडे यांनी वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी २९ जानेवारीला निश्चित केली.

logo
marathi.freepressjournal.in