पात्र कामगार, वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र ३०४ गिरणी कामगार, वारसांना नवव्या व दहाव्या टप्प्यांतर्गत नुकतेच सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
पात्र कामगार, वारसांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र ३०४ गिरणी कामगार, वारसांना नवव्या व दहाव्या टप्प्यांतर्गत नुकतेच सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, नवव्या व १० व्या टप्प्यात १,७७४ गिरणी कामगार व वारसांना हक्काच्या सदनिका मिळाल्या आहेत.

वांद्रे पूर्वेकडील समाज मंदिर हॉलमध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, उपमुख्य अधिकारी योगेश महाजन आदी उपस्थित होते. आतापर्यंत सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १७७४ गिरणी कामगारांना १५ जुलै, २०२३ पासून दहा टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. मुंबई मंडळ व कामगार विभाग यांच्यातर्फे सोडतीतील उर्वरित गिरणी कामगार/वारस यांची पात्रता निश्चित करण्याचे काम वेगात सुरू आहे. या गिरणी कामगार/वारस यांची पात्रता लवकर निश्चित करून त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न असल्याचे सुनील राणे यांनी सांगितले. बृहन्मुंबईतील ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. या अभियानाला गिरणी कामगार/वारसांचा वाढता प्रतिसाद बघता या अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने एकूण १,०६,८५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८७,६९५ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू असल्याचे सुनील राणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in