
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये चाळीत वास्तव्यास असलेल्या पात्र पोलीस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या ११३३ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती गुरुवारी करण्यात आली. या पात्र पोलीस कर्मचारी गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या इमारतींमधील मालकी तत्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीची विंग, इमारतीतील सदनिकेचा मजला निश्चित करण्यात आला.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक २२ ते २८, ६४ ते ७४ व ७७ मध्ये वास्तव्यास असलेल्या ११३३ पात्र पोलीस कर्मचारी यांमध्ये सेवेत कार्यरत, सेवानिवृत्त व दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे कायदेशीर वारस यांचा समावेश असलेल्या भाडेकरू/रहिवासी यांची यादी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाला पाठविण्यात आली आहे. त्यानुसार या यादीतील पात्र भाडेकरू / रहिवाशांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये मालकी तत्वावर मिळणाऱ्या सदनिकांचा क्रमांक यादृच्छिक पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित करण्यात आला.