मुंबई : मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. १ ऑगस्ट २०२४ रोजी काढलेल्या नियमानुसार २५,५० व ७५ वर्षें पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांना सरसकट पाच वर्षे मंडप उभारणीची परवानगी देण्यात येणार आहे. याचा फायदा काही मंडळांना होणार आहे. त्यामुळे सरसकट सगळ्यांचं मंडळांना मंडप उभारणीची परवानगी द्या, अशी मागणी बृहन्मुंबई समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई महापालिकेने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मंडप उभारणीसाठी केवळ १०० रुपये नाममात्र शुल्क आकारणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांत कायद्याचे पालन करून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना सलग पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी, लागेल अशी सवलत जाहीर करण्यात आली आहे. याबाबत मंडळांना अॅफिडेविट द्यावे लागणार आहे; मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना काळात मंडळांवर उत्सव साजरा करताना अनेक निर्बंध होते. याचा फटका मंडळांना बसणार असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले आहे. शिवाय इतर अटींमुळे सलग परवानगीचा फायदा होणार नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदनही दिले आहे.
...मग सूट आणि नियमित परवानगीत फरक काय?
पालिकेच्या पाच वर्षे परवान्याची घोषणा केली असली, तरी जाचक अटींमुळे बहुतांशी मंडळे सलग परवान्यापासून वंचित राहणार आहेत. पाच वर्षांसाठी सलग परवानगी मिळाल्यानंतरही प्रत्येक वर्षी पोलीस व वाहतूक विभागाची परवानगीची अटसुद्धा घातली आहे. यामुळे दरवर्षी गणेश मंडळांना पालिका, पोलीस वाहतूक इत्यादी ऑथरिटी कडे हेलपाटे घालावे लागणार आहेत. मग पालिका जी सूट देत आहे त्यात व नियमित परवानगी यात फरक काय, असा सवालही समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
'या' प्रश्नांची उत्तरे द्या
उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळांना सलग पाच वर्षाची परवानगी देण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम म्हणजे नेमके काय?
कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाची जी अट घातलेली आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार का?
जी गणेश मंडळे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करतात त्याला आपणाकडून बंदी घालणार का?