साडेतीन वर्षांनंतर भरपाईसाठी दावा दाखल करण्यास परवानगी ;रेल्वे प्रवासात डोळे गमावलेल्या प्रवाशाला दिलासा

अर्जदाराचा गुणवत्तेच्या आधारावर भरपाईचा दावा मान्य झाल्यास अर्जदार व्याजाच्या रक्कमेसाठी मात्र दावेदार ठरणार नाही
साडेतीन वर्षांनंतर भरपाईसाठी दावा दाखल करण्यास परवानगी ;रेल्वे प्रवासात डोळे गमावलेल्या प्रवाशाला दिलासा

मुंबई : सात वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवासात अज्ञात वस्तूचा मार लागून डोळा गमावलेल्या प्रवाशाला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी भरपाईचा दावा दाखल करण्यात झालेला साडेतीन वर्षांचा विलंब माफ करून गुणवत्तेच्या आधारे भरपाईचा फैसला करण्याचे निर्देश रेल्वे दावे न्यायाधिकरणाला दिले. यामुळे प्रवाशाला मोठा दिलासा मिळाला.

चेंबूर येथील ३९ वर्षीय राकेश कांबळे हे मीरा रोड ते अंधेरीपर्यंत ३० एप्रिल २०१६ रोजी लोकलने प्रवास करत असताना प्रवासात अज्ञात वस्तूचा मार लागला. त्यात त्याला डावा डोळा गमवावा लागला. या अपघाताबद्दल भरपाई मिळू शकते, हे लक्षात आल्यानंतर राकेशने एप्रिल २०२० मध्ये रेल्वे दावे न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. मात्र भरपाईचा दावा करण्यात विलंब झाल्याचे स्पष्ट करत न्यायाधिकरणाने राकेशला भरपाईचा दावा स्वीकारण्यास नकार दिला.

त्या विरोधात राकेशच्या वतीने ॲॅड. दीपक आजगेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. या याचिकेची न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत, दावा दाखल करण्यात झालेला विलंब माफ केला. तसेच गुणवत्तेच्या आधारे भरपाईबाबत फैसला करण्याचे आदेश मुंबईच्या रेल्वे दावे न्यायाधिकरणाला दिले. तसेच अर्जदाराचा गुणवत्तेच्या आधारावर भरपाईचा दावा मान्य झाल्यास अर्जदार व्याजाच्या रक्कमेसाठी मात्र दावेदार ठरणार नाही, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in