ललित पाटीलसह दोघांना न्यायालयीन कोठडी ;एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरण

साकीनाका पोलिसांनी एमडी ड्रग्जचा पर्दाफाश करताना आतापर्यंत १८ आरोपींना अटक केली
ललित पाटीलसह दोघांना न्यायालयीन कोठडी
;एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरण

मुंबई : एमडी ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या ललित अनिल पाटील व त्याचा कारचालक सचिन साहेबराव वाघ यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर इतर दोन आरोपी आमीर आतिक खान आणि हरिश्‍चंद्र पंत यांच्या पोलीस कोठडीत शुक्रवार ३ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या चौघांना सोमवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

साकीनाका पोलिसांनी एमडी ड्रग्जचा पर्दाफाश करताना आतापर्यंत १८ आरोपींना अटक केली असून त्यात या टोळीचा मुख्य सूत्रधार ललित पाटील याचा समावेश होता. याच गुन्ह्यांत ललितला बंगलोर येथून अटक केल्यानंतर त्याचे तीन सहकारी सचिन वाघ, आमीर खान आणि हरिश्‍चंद्र पंत यांना गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी या चौघांनाही कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी ललितसह त्याचा चालक सचिनला कोर्टाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले तर आमीर आणि हरिश्‍चंद्रच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे या दोघांना आता पुन्हा शुक्रवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या टोळीच्या अटकेनंतर पोलिसांनी नाशिकच्या एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी १६३ किलो ८८२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्जसह एक गावठी कट्टा, सात जिवंत काडतुसे, चार लाखांची कॅश असा ३२५ कोटी २६ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in