
शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे गटातील वाद सध्या विकोपाला गेलेला आहे. पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला दिलेली स्थगिती उठवल्याने हा संघर्ष आता निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. या वादात शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह हातातून निसटल्यास पर्यायी पक्षचिन्हाची चाचपणी ठाकरे गटाने सुरू केली आहे. निवडणूक आयोगासमोर या पक्षचिन्हाबाबत जोरदार बाजू मांडण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. मात्र, शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ हे शिंदे गटाला मिळाल्यास किंवा निवडणूक आयोगाने ते गोठवल्यास पर्याय म्हणून पक्षाच्या विचारसरणीला साजेसे पक्षचिन्ह चाचपून पाहण्यात येत आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने पक्षाच्या विरोधात निकाल दिल्यास शिवसेना अडचणीत येऊ शकते. त्यामुळे याबाबत पक्षाने सावध भूमिका घेतली आहे. पक्षाने पक्षचिन्हाबाबत आपला प्लॅन ‘ब’ तयार ठेवला आहे. कारण मुंबई महापालिकेत पक्षाला पुन्हा सत्ता काबीज करायची आहे. वेळ पडल्यास पक्ष नवीन पक्षचिन्हावर निवडणूक लढवेल. तसेच मतदारांना नवीन पक्षचिन्हाची ओळख पटण्यासाठी शाखास्तरावर आणि विभाग स्तरावर व्यापक प्रचार मोहीम हाती घेतली जाणार आहे. आपलीच खरी शिवसेना असल्याचे शिंदे गट म्हणत आहे. तसेच पक्षाच्या चिन्हावर त्यांनी दावा केला आहे.
पक्षाच्या नियोजनानुसार, बूथ स्तरावर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे सक्रीय करण्यात आले आहे. नवीन पक्षचिन्ह, पक्षाने केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुख व विभागप्रमुखांसोबत अधिकाधिक संवाद साधायला सुरुवात केली आहे. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कोणते कार्य केले याच्या आठवणी जागवण्यात येणार आहेत. पूर, जातीय दंगली, साखळी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला या काळात शिवसैनिकांनी मदत केली होती. यामुळे सध्याच्या संकटाच्या काळातून पक्षाला मोठी दिशा मिळू शकेल. भविष्यातही शिवसेनेसोबत राहावे, असे आवाहन याद्वारे करण्यात येणार आहे.
पक्षाच्या चिन्हाच्या प्रचारासाठी ऑनलाईन, मुद्रित यंत्रणा राबवण्यात येणार आहे. यासाठी सोशल मीडियाची खास टीम तयार करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव यांना सत्तेबाहेर काढणाऱ्यांना मदत करू नये, असे आवाहन याद्वारे केले जाणार आहे.