

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्ताने १४ एप्रिलला दादर येथील चैत्यभूमीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी येतात. सुरक्षेसाठी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, स्क्रॅनर, पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी सोयीसुविधा मुंबई पालिका सज्ज असून विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
चैत्यभूमी परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘राजगृह’ या ठिकाणी आणि इतर ठिकाणी पालिकेकडून सेवासुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांच्या वैचारिक साहित्य, विविध स्टॉल तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पोहोचवले जातात.
परिसरात स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि मूलभूत सोयींवर विशेष भर देण्यात आला आहे.
चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष व टेहळणी मनोरा उभारण्यात येणार असून संपूर्ण परिसरावर देखरेख ठेवली जाणार आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी बॅगेज स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हँडहेल्ड मेटल डिटेक्टर आणि ३२ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात येणार आहेत.
अनुयायांच्या सोयीसाठी रांगेत पडदे लावणे, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था आहे.
स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येक शिफ्टमध्ये वाहने तसेच सुमारे ४० कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. परिसरात कीटकनाशक व अँटीफ्लाय फवारणीही तीन शिफ्टमध्ये केली जाणार आहे.
आरोग्य सेवांमध्ये ३० वैद्यकीय अधिकारी व ७० सहाय्यक कर्मचारी तैनात असतील.
मेडिसीन व सर्जरी विभागाची सुविधा उपलब्ध असून रुग्णवाहिका व एक रक्तदान वाहनही सज्ज आहेत.