
मुंबई : दादर येथील इंदू मिल परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक प्रकल्पाचा एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्मारकाशी सर्व संबंधित यंत्रणांना कामातील गती वाढवण्याचे निर्देश दिले.
इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. यामधील डबल बेसमेंट (पार्किंग) चे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. प्रवेश प्रांगणाचे ८८.५ टक्के काम पूर्ण झाले असून व्याख्यानगृह ७८.७५ टक्के, ग्रंथालय ८१ टक्के, प्रदर्शन व प्रेक्षागृह ६८ टक्के आणि पदपथ इमारतीचे काम ५२.८ टक्के पूर्ण झाले आहे.
पुतळा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. २३० फूट उंचीच्या थर्माकोल मॉडेलचे काम पूर्ण झाले असून १३९५ मेट्रिक टन संरचनात्मक स्टील खरेदी झाली आहे. १५५ मेट्रिक टन बेसप्लेटचे फॅब्रिकेशन व उभारणी पूर्ण झाली आहे.
एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या भव्य स्मारकाशी सर्व संबंधित यंत्रणांना कामातील गती वाढवून स्मारक वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त हे कार्य अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प एमएमआरडीएने केला आहे. दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या या स्माराकाची सर्वांना प्रतिक्षा आहे.