अंबिका सेवा मंडळाच्या दुर्गा सेवेचे ५० वे वर्ष

कोरोनानंतर जरी उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येत असला, तरी संस्कृतीला कुठेही गालबोट लागणार नाही
 अंबिका सेवा मंडळाच्या दुर्गा सेवेचे ५० वे वर्ष

''दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी'' हे अंबेमातेचे वर्णन आणि त्यामागची भावना आणि मातेची निस्वार्थपणे सेवा करण्याचे काम कुर्ला येथील अंबिका सेवा मंडळाकडून अविरत केले जात आहे. मंडळाच्या नवरात्र उत्सव समितीचे हे यंदाचे ५० वे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. १९७२ मध्ये परिसरातील महिलांनी एकत्र येत नवरात्रोत्सवाला सुरुवात केली. यानंतर अनेक हात या मंडळाला लाभले असून कुर्लाच नव्हे, तर मुंबईसह आजूबाजूच्या शहरात या मंडळाचा, उत्सवाचा बोलबाला आहे.

कोरोनानंतर जरी उत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येत असला, तरी संस्कृतीला कुठेही गालबोट लागणार नाही या भावनेने कुर्ला येथील अंबिका सेवा मंडळाने यंदाच्या ५० व्या वर्षी लाडक्या देवीची प्रतिष्ठापना केली आहे. आनंदमय वातावरणात मातेचे आगमन करत मंडळातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, महिलांनी एकत्र येत आपल्या अंबे मातेसाठी फुलांची साधी तितकीच रेखीव अशी सजावट केली आहे. महिलांनी पुढाकार घेत नवरात्र उत्सवादरम्यान हळदीकुंकू, गोंधळाचे आयोजन केले आहे. याशिवाय समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी जोपासण्यासाठी मंडळाकडून आरोग्य तपासणी, दंत तपासणी, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच योगा शिबीर आणि शैक्षणिक दृष्टया बळकटी मिळावी यासाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या बालवाडी मंडळाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. नऊ दिवस मंडळातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील भक्त या जागृत देवस्थानी येत आपल्या ऊज्वल, निरोगी भविष्यासाठी अंबे मातेकडे साकडे घालतात. अंबिका सेवा मंडळाचे अध्यक्ष कन्नन पिल्ले असून नवरात्र उत्सवासाठी वेगळी समिती मंडळाकडून स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अनेक तरुण, महिला सहभागी आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in