शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले शिंदे गटाचा हात पकडणार?

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेचे अधिकाधिक नगरसेवक फोडण्याचे मनसुबे शिंदे गटाने आखले आहेत
 शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले शिंदे गटाचा हात पकडणार?

दहिसर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे वडाळा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले शिंदे गटाचा हात पकडणार, अशी चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोले गणपतीला भेट दिल्यानंतर घोले यांनी शिंदे यांचे जोरदार स्वागत केले. त्यामुळे शीतल म्हात्रे यांच्यानंतर घोले यांच्यासह १५ ते २० शिवसेना नगरसेवक शिंदे गटाचा हात धरणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे

राज्यातील इतर महापालिकांमधील नगरसेवक फोडण्यास शिंदे गटाला यश मिळाले असले, तरी मुंबईतील सेनेची तटबंदी व शिवसेनेला मानणारा कट्टर शिवसैनिक आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेचे अधिकाधिक नगरसेवक फोडण्याचे मनसुबे शिंदे गटाने आखले आहेत. त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य व आदित्य यांच्या जवळचे अमेय घोले यांना शिंदे गटात घेऊन आदित्य यांना धक्का देण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुरू केला असल्याचे बोलले जाते आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री वडाळा सहकारनगर गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला भेट दिली. त्यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष असलेल्या अमेय घोले यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून स्वागत केले. खासदार शेवाळे हे मुख्यमंत्र्यांना गणपतीच्या दर्शनासाठी घेऊन आले होते. त्यावेळी त्यांनी घोले यांची भेट मुख्यमंत्र्यांसोबत घडवून दिली. घोले-मुख्यमंत्री भेटीने परिसरातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली असून त्याचे पडसाद सोशल मीडियात उमटले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in