मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम
Photo : X (Devendra Fadanvis)
Published on

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आशिष शेलार यांचा मुंबई भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर आता भाजपने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

भाजप नेत्यांची बैठक सोमवारी सकाळी मुंबईत पार पडली. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित साटम यांची भाजपचे नवीन मुंबई अध्यक्ष म्हणून घोषणा केली. साटम तीन वेळा आमदार असून त्यांची लोकांमध्ये चांगली पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी मुंबई महापालिकेत कमळ फुलणार असून निवडणुकीत भाजप नवीन रेकॉर्ड तयार करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा यांसह अन्य नेते उपस्थित होते.

मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि अमित साटम या फडणवीस यांच्या विश्वासू नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, साटम यांच्या गळ्यात ही माळ पडली. “गेल्या ११ वर्षांत क्रांतिकारक बदल घडले असून मुंबईचा विकास आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहे,” असे अमित साटम म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विश्वास दाखवल्याबद्दल आणि इतकी महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल साटम यांनी या सर्वांचे मनापासून आभार मानले.

“पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी आपले प्राधान्य राहील. मागील काही वर्षांपासून मुंबई शहराची ओळख बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाईल. मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आणि महायुतीचा महापौर करण्यासाठी काम करू,” असेही त्यांनी सांगितले.

१९९७ ते २०२२ पर्यंत मुंबई महापालिकेत झालेल्या देशातील सर्वाधिक ३ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावरून साटम यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. “पालिकेला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी आणि नागरी प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल. पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी भाजप कार्यकर्ते प्रत्येक मुंबईकरांच्या दारावरती पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेतील,” असेही आमदार अमित साटम म्हणाले.

भाजपला मराठी चेहरा दिल्याशिवाय पर्याय नव्हता - संजय राऊत

आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, त्या दृष्टीने आमदार साटम यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. “भाजपला मराठी माणसाला त्या पदावर आणण्याशिवाय काहीही पर्याय राहिलेला नव्हता. आशिष शेलार हे या यापूर्वी अध्यक्ष होते. भाजपमध्ये काय राजकारण घडतेय, हे मला माहीत नाही. शेलारांना निवडणुकीच्या तोंडावरती जावे लागत आहे,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मुंबईत महायुतीची सत्ता येईल - फडणवीस

अमित साटम हे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेत. त्यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम केले. त्यांनी यापूर्वी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विधानसभेत एक अभ्यासू व आक्रमक आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण त्यांना असून प्रश्न सोडवण्यासाठीची कल्पकता त्यांच्याकडे आहे. त्यामु्ळे निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत आपली घोडदौड कायम राखेल. पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास मला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in