
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी घोषणा केली आहे. आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज (दि.२५) सकाळी मुंबई भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परीषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार देखील उपस्थित होते.
अमित साटम अभ्यासू आणि आक्रमक; बीएमसीत पुन्हा महायुतीचीच सत्ता - फडणवीस
यावेळी बोलताना, महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोअरकमिटीच्या सर्व सदस्यांशी आणि वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर अमित साटम यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितले. "अमित साटम तीन वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलं आहे आणि भाजपमध्ये त्यांचा प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. त्यांनी संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वीही पार पाडल्यात. विधानसभेत एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरीता जी कल्पकता हवी ती त्यांच्याकडे आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईमध्ये आपली घोडदौड कायम राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई मनपामध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे", असे फडणवीस म्हणाले.
मुंबईमध्ये भाजप एक नवीन रेकॉर्ड बनवेल
अमित साटम सर्वप्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या निश्चितपणे चांगल्याप्रकारे पार पाडतील. मुंबईतील सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत. महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, माजी अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपा एक नवीन रेकॉर्ड बनवेल आणि त्याकरीता अमित साटम यांना मनामापासून शुभेच्छा देतो. त्यांची एक उज्ज्वल कारकिर्द असावी अशी प्रार्थना इश्वराच्या चरणी करतो, असेही फडणवीस म्हणाले.
आशिष शेलार आणि लोढांनी उत्तम काम केलं - फडणवीस
प्रदीर्घ काळ आशिष शेलार यांनी मुंबईचं अध्यक्षपद समर्थपणे सांभाळलं. २०१७ च्या मनपा निवडणुका, लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तम काम त्यांनी केलं. मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळात मंगलप्रभात लोढा यांनीही चांगल्या पद्धतीने मुंबई अध्यक्षाचा कार्यभार सांभाळला आणि पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षाची धुरा आली. त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेत अत्यंत चांगलं यश मिळालं आणि भाजप मुंबईतील एक नंबरचा पक्ष म्हणून वर्चस्व सिद्ध केलं. आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे मंत्रीपदाचा भार आला आहे. त्यामुळे भाजपने नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.