मुंबई : शाळेसाठी राखीव असलेले भूखंड पीपीपी धोरणांतर्गत खासगी संस्थांना वाटप करण्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. शाळेसाठी असलेल्या पाच भूखंडांचे वाटप तत्काळ रद्द करण्यासाठी महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी पत्र लिहिले आहे.
पालिकेने मुंबई महापालिका शाळांसाठी राखीव असलेले पाच भूखंड खासगी संस्थांना पीपीपी मॉडेल अंतर्गत वाटप करण्याची प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे. हे धोरण अशा काळात तयार करण्यात आले, जेव्हा मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नव्हती. धोरणातील अटी व शर्ती, पालिकेची भूमिका किंवा पालिकेला मिळणारे लाभयावर कोणतीही चर्चा झाली नाही.
लोकप्रतिनिधींशी पुरेशी चर्चा न करता आणि पारदर्शकतेचा अभाव ठेवून हे धोरण घाईघाईने लागू करण्यात आले आहे. या धोरणामुळे मुंबई महापालिकेच्या हिताला बाधा पोहोचल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असा आरोपही आमदार साटम यांनी केला आहे. मुंबई महापालिका मुंबई महापालिकेने पाच भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करावे, समिती नेमावी, सर्वसमावेशक धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.