पुढील तीन ते चार वर्षांत मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त! मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा निर्धार

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची साखळी आम्ही मोडीत काढणार असून पुढील तीन ते चार वर्षांत मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त होईल, असा निर्धार मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला.
पुढील तीन ते चार वर्षांत मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त! मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा निर्धार
छायाचित्र : सलमान अनसारी
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची साखळी आम्ही मोडीत काढणार असून पुढील तीन ते चार वर्षांत मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त होईल, असा निर्धार मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्रच निवडणूक लढणार आहे. महायुतीत जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. महायुतीतील घटक पक्षांनी निवडणुकीची रणनीती आखली असून मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता येईल आणि महापौर महायुतीचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम यांनी सोमवारी दैनिक ‘नवशक्ति’ आणि ‘फ्री प्रेस जर्नल’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याच्या विकासाला चालना दिली आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून राज्याचा सुरू असलेला वेगवान विकास यापुढेही थांबणार नाही. महायुतीने केलेल्या कामांची पोचपावती विधानसभा निवडणुकीत जनतेने मतांच्या रुपात दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचीच सत्ता येईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत सत्ता कोणाचीही असली तरी पालिकेत काही कंत्राटदारांचा बोलबाला आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार फोफावला आहे. महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणारे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. मुंबई महापालिकेत तयार झालेली भ्रष्टाचाराची साखळी तोडणे गरजेचे असून ही साखळी तोडली तर मुंबई महापालिकेची भ्रष्टाचारातून मुक्तता होईल, असे ते म्हणाले.

मुंबईच्या रस्त्यांच्या खाली विविध प्राधिकरणाच्या युटिलिटीज असून मुंबई महापालिका प्रशासनाने रस्ता तयार केला की, विविध प्राधिकरणे त्याच ठिकाणी खोदकाम करतात. एकदा मुंबई महापालिका प्रशासनाने रस्ता तयार केला की, पुन्हा त्यावर खोदकाम करण्याआधी स्थानिक लोकप्रतिनिधींशी संबंधित प्राधिकरणाने चर्चा केली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.‌

मुंबईत पार्किंग, वाहतूक कोंडीची समस्या, बेकायदा फेरीवाले असे अनेक प्रश्न आहेत. यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असताना गेल्या २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही. बेकायदा फेरीवाल्यांचे माफिया राज मोडीत काढणे गरजेचे आहे. अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा फेरीवाले होते. अनेकदा हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पालिका प्रशासनाकडून काही अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी सहभाग घेतला आणि आज अंधेरी पश्चिम स्टेशन परिसर फेरीवालामुक्त झाला असून यासाठी स्थानिक पोलिसांचे मनापासून आभार मानतो, असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर मुंबईकरांच्या समस्या प्राधान्याने सोडवत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.

मेट्रो रेल्वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी होणार असून त्यानंतर नरिमन पॉइंट ते आरेपर्यंतचा प्रवास सुसाट होईल. नरिमन पॉइंट ते आरेपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईकर खाजगी वाहनांचा वापर कमी करतील. तसेच वेस्टर्न एक्स्प्रेसची वाहतूक कोंडी फुटेल, असेही ते म्हणाले.

लवकरच मुंबई खड्डेमुक्त!

मुंबईतील रस्तेकामातही भ्रष्टाचार होता, परंतु भाजपने यावर आवाज उठवला आणि निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई खड्डेमुक्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे आज ५० टक्क्यांहून अधिक रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे झाले असून उर्वरित ५० टक्के रस्ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे तीन ते चार वर्षांत मुंबई खड्डेमुक्त असेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in