
मुंबई : मंत्री-आमदारांची बेताल वक्तव्ये, रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा वाद, निधी मिळत नसल्याची शिंदे सेनेची अजित पवारांवर नाराजी, महायुतीतील वाद चव्हाट्यावर येत आहेत. यामुळे महायुतीती बदनामी होत असून अंतर्गत वाद थांबवा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय रणनीती असावी याबाबत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले असता शहा व शिंदे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी रात्री मुंबईत दाखल झाले. शनिवारी शहा यांनी लालबागचा राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह भाजपचे नेते उपस्थित होते.
मराठा आंदोलकांशी चर्चेची जबाबदारी?
मुंबईतील बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा सह्याद्री अतिथीगृहात काही वेळासाठी थांबले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. तसेच मराठा आरक्षणावर शहा यांनी शिंदेंकडून माहिती घेत आंदोलकांशी संवाद साधा, असा सल्ला दिला.