भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

देशाच्या इतिहासाचे आणि ज्ञानपरंपरेचे वसाहतवादमुक्तीकरण म्हणजे भूतकाळ पुसून टाकणे नव्हे, तर भारतीय दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर प्रामाणिकपणे मांडणे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितले.
भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
भारतीय दृष्टिकोनातून इतिहास मांडणे गरजेचे; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन(Photo-X)
Published on

मुंबई : देशाच्या इतिहासाचे आणि ज्ञानपरंपरेचे वसाहतवादमुक्तीकरण म्हणजे भूतकाळ पुसून टाकणे नव्हे, तर भारतीय दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर प्रामाणिकपणे मांडणे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सांगितले.

मुंबईतील एशियाटिक सोसायटी येथे हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतीय ज्ञानपरंपरा, इतिहास, परंपरा, भाषा, हस्तलिखिते आणि अभिलेखांचे जतन करून ते देशातील तसेच जगभरातील लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे शहा यांनी सांगितले.

दीर्घकाळ भारतीय ज्ञानाचा अर्थ लावण्याचे काम वसाहतवादी दृष्टिकोनातून झाले. त्यामुळे भारतीयांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्यास हातभार लागला, असे शहा म्हणाले. एशियाटिक सोसायटीसारख्या संस्था भारतीय ज्ञानाचे जतन करून त्याचा उपयोग देश आणि जगाच्या कल्याणासाठी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहा म्हणाले की, ब्रिटिशांनी ज्ञान आणि सत्तेची सांगड घातली होती. आता ज्ञानाला त्या चौकटीतून मुक्त करण्याचे काम करणे आवश्यक आहे. आज आपण ज्ञानाला त्या चौकटीतून मुक्त करण्यासाठी आणि वसाहतवादमुक्तीकरणाच्या दिशेने पुढे जात आहोत, असेही शहा म्हणाले.

ज्या राष्ट्राला आपली स्मृती, इतिहास, परंपरा, संस्कृती, भाषा आणि अभिलेखांचे संरक्षण करता येत नाही, ते राष्ट्र कितीही शक्तिशाली असले तरी दीर्घकाळ टिकू शकत नाही, असे शहा यांनी सांगितले.

संस्कृती, परंपरेचे संरक्षण गरजेचे

ज्या राष्ट्राने आपल्या स्मृती, इतिहास, परंपरा, संस्कृती, अभिलेख, भाषा आणि व्याकरणाचे संरक्षण केले आहे, त्या राष्ट्राला कितीही वर्षे परकीय सत्तेखाली ठेवले तरी गुलाम बनविता येत नाही. भारत हे त्याचे उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in