संस्कृती आणि भाषांच्या संवर्धनातूनच ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ मजबूत होईल; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन

सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे भारताची संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे होय.
संस्कृती आणि भाषांच्या संवर्धनातूनच ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ मजबूत होईल; अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे भारताची संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे होय. आपल्या देशातील विविध भाषांचे सूर वेगवेगळे असू शकतात, परंतु राष्ट्रीय भावना एकच राहिली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत केले. भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत, असे सांगतानाच एक मूल आपल्या मातृभाषेतूनच देश खऱ्या अर्थाने समजू शकते, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती' या संकल्पाशी भारतीय भाषांच्या संवर्धनाला जोडत अमित शाह मुंबईत आयोजित ६ व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात बोलत होते.

लोकमान्य आणि छत्रपतींचा उल्लेख

अमित शाह म्हणाले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाची संस्कृती आणि इतिहासाविषयीची जागृती सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते हे ओळखले होते. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. हे दोन्ही उत्सव पुढे महाराष्ट्राबाहेर पसरले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात देशभक्तीची लाट निर्माण झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी 'स्वराज्य', 'स्वधर्म' आणि 'स्वभाषा' यांना स्वशासनाचे अविभाज्य भाग मानले होते आणि प्रशासनात मराठी भाषेला उच्च स्थान दिले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

राष्ट्रीय शिक्षण धोरण

मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेणे अनिवार्य केले आहे. मोदी यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी मातृभाषेतील शिक्षणासोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. जे धोरणामधील या तरतुदीला विरोध करत आहेत, त्यांना आपण काय चूक करत आहोत याची कल्पना नाही, असे शहा म्हणाले. आयएएस, आयपीएस यांसारख्या परीक्षा आता मातृभाषेत देता येतात, तर जेईई, नीट आणि पदवी परीक्षा १३ भाषांमध्ये आयोजित केल्या जात आहेत. केंद्र सरकारला भारतीय भाषांना प्रशासन आणि विज्ञानाची भाषा बनवायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

'वंदे मातरम' आणि तांत्रिक उपक्रम

'वंदे मातरम'विषयी शहा म्हणाले की, हे केवळ एक गीत नसून भारतीय चेतना जागृत करण्याचा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचण्याचा प्रयत्न होता. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर नेहमी हिंदी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये भाषणे दिल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात 'भारती' हे बहुभाषिक भाषांतर साधन आणि 'भारतीय भाषा अनुभाग' याविषयी माहिती देण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून 'कंठस्थ २.०', 'लीला राजभाषा' आणि 'लीला प्रवाह' यांसारखी संसाधने विकसित करण्यात आली आहेत. संमेलनात 'राजभाषा भारती' (वंदे मातरम विशेष अंक) आणि 'वंदे मातरम के १५० अध्याय' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, तसेच 'राजभाषा कीर्ती' आणि 'राजभाषा गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आले.

रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचा दाखला देत गृहमंत्री म्हणाले, भारतीय संस्कृती आणि साहित्य हे अनेक पाकळ्या असलेल्या कमळासारखे आहे, ज्यातील प्रत्येक प्रादेशिक भाषा ही एका पाकळीसारखी आहे. भाषा अनेक असल्या तरी भावना भारतीयच राहिली पाहिजे.

भारतीय भाषांचा संगम

गृहमंत्र्यांनी सांगितले की, ५१,००० शब्दांपासून सुरू झालेला 'हिंदी शब्द सिंधू' हा शब्दकोश आता आठ लाख शब्दांपर्यंत पोहोचला आहे. २०२९ पर्यंत तो जगातील सर्वात मोठा शब्दकोश बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शब्दकोशात जिथे हिंदीत शब्दांची कमतरता होती, ती पूर्ण करण्यासाठी तमिळ, तेलगू, मराठी, गुजराती, बंगाली आणि ओरिया यांसारख्या विविध प्रादेशिक भाषांमधील ५०,००० हून अधिक शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे हिंदी अधिक लवचिक झाली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in