अमित शहांचे शिंदे, फडणवीसांशी गुफ्तगू अजितदादांची मात्र अनुपस्थिती : राज्यातील घडामोडींना वेग

प्रतापराव दिघावकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या अटीवरच भाजपमध्ये प्रवेश केला
अमित शहांचे शिंदे, फडणवीसांशी गुफ्तगू
अजितदादांची मात्र अनुपस्थिती : राज्यातील घडामोडींना वेग
Published on

मुंबई : लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरील सुनावणीला वेग आला असताना या चर्चेला विशेष महत्त्व आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. अमित शहा यांचा दौरा नियोजित असताना अजित पवार यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी वांद्रे येथे भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आले. त्यांनी ‘वर्षा’ येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी आले.

इथे देवदर्शनानंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजला नाही. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास विलंब लावल्याने सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले. त्यानंतर नार्वेकर यांनी दिल्लीला जाऊन कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. येत्या आठ दिवसांत आपण या प्रकरणावर निर्णय घेऊ, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा विशेष महत्त्वाचा आहे. त्यातच त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. अजित पवार सध्या त्यांच्या नियोजित बारामती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते मुंबईत अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान बैठकीत हजर राहू शकले नाहीत, अशी माहिती मिळत आहे.

अमित शहा आणि शिंदे-फडणवीस यांच्यात ‘सागर’ बंगल्यावर १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोमवारपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू होणार आहे. याबाबत या बैठकीत रणनीती ठरल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतही चर्चा झाल्याचे समजते. ‘सागर’ बंगल्यावर भाजप आणि शिंदे गटातील अन्य नेतेही उपस्थित होते. बंद दाराआडील चर्चेचे परिणाम लवकरच राजकारणात दिसतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

फडणवीस यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्यानंतर अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावरही बंद दाराआड चर्चा झाली. सत्ताधारी तीन पक्षांमध्ये कसा समन्वय आहे, याचा आढावा अमित शहा यांनी यावेळी घेतला. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, लोकसभा निवडणूक यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. लवकरच मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे कार्यक्रम घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

लोकसभेसाठीही चाचपणी

गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत लोकसभेच्या उमेदवारीबाबातही चर्चा केल्याची माहिती आहे. जळगावमधून उज्ज्वल निकम, धुळ्यातून प्रतापराव दिघावकर, मुंबईतल्या एका मतदारसंघासाठी माधुरी दीक्षित, तर पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनील देवधर यांच्या नावांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सुनील देवधर यांना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी थेट दिल्लीतून यापूर्वीच आदेश आल्याची माहिती आहे, तर प्रतापराव दिघावकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या अटीवरच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in