गणेशोत्‍सवाच्या दरम्‍यान अमित शहा मुंबईत येणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व

दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत
 गणेशोत्‍सवाच्या दरम्‍यान अमित शहा मुंबईत येणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणेशोत्‍सवाच्या दरम्‍यान मुंबईत येणार आहेत. महापािलका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे. अमित शहा आपल्‍या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत. ते लालबागच्या राजाचेही दर्शन घेतील.अमित शहा हे २०१७ साली भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हापासून ते मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात; मात्र गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्‍याने निर्बंध होते. त्‍यामुळे त्यांनी दर्शनाला येणे टाळले होते. यंदाच्या वर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्‍यामुळे अमित शहा दर्शनाला येणार आहेत. येत्‍या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना कमकुवत झाली आहे. मुंबईतील अनेक आमदार तसेच नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. भाजपने मिशन मुंबई आखले आहे. मुंबई महानगरपालिकेवरील शिवसेनेची सत्ता यावेळी कोणत्‍याही परिस्‍थितीत हस्‍तगत करायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. आगामी काळात कोणती रणनीती आखायची, याचीही चर्चा शहा यांच्या मुंबई दौऱ्यावेळी होण्याची शक्‍यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in