अमित शहा ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार

भाजपने यावेळी मुंबई महानगर पालिकेसाठी ‘मिशन २००’ ची आखणी केली आहे.
अमित शहा ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार
Published on

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई’ महापालिकेचा प्रारंभ करणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहा हे प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत. भाजपने यावेळी मुंबई महानगर पालिकेसाठी ‘मिशन २००’ ची आखणी केली आहे.

अमित शहा ५ तारखेला लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतील. याशिवाय सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन होतील. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. २९ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचाच, हे ध्येय भाजपने ठेवले आहे. त्यादृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा प्रारंभ होईल.

अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून म्हणजे २०१७ पासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत २२७ नगरसेवक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in