मुंबईत लवकरच ८ किमी लांबीचा सायकल ट्रॅक उपलब्ध होणार; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची ग्वाही

येत्या मे अखेरपर्यंत मुंबईमध्ये एकंदर सुमारे ८ किलोमीटर लांबीचे स्वतंत्र सायकल ट्रॅक नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
भूषण गगराणी
भूषण गगराणीसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : येत्या मे अखेरपर्यंत मुंबईमध्ये एकंदर सुमारे ८ किलोमीटर लांबीचे स्वतंत्र सायकल ट्रॅक नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

मुंबईतील पहिली वहिली "वॉकेबल सिटीज मुंबई परिषद" वॉकिंग प्रोजेक्ट या २०१२ पासून कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने वाय. बी. चव्हाण केंद्रात पार पडली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले की, मुंबईला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय व्यवस्थेची अजूनही कमतरता आहे. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये पादचारी सुविधा खूपच कमी आहेत. तसेच सध्या मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रोचा विस्तार, अटल सेतु सारख्या मोठ्या पायाभूत सेवा निर्माण केल्या जात असल्याने नागरिकांना रस्त्यात चालण्यात समस्या येत आहेत. परंतु त्या सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत,” गगराणी म्हणाले.

या परिषदेत सार्वजनिक धोरण तज्ञ, नागरी आराखडा आणि स्थापत्यविशारद, तसेच शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांची मुंबईमधील पादचारी सुविधा आणि पर्यावरणीय व्यवस्था सुधारण्यासाठी विविध स्तरांवर खाजगी आणि सरकारी माध्यमातून कोणते उपाय योजावे लागतील यावर विस्तृत चर्चासत्रे पर पडली.

मुंबई मनपाचे आयुक्त गगराणी म्हणाले की, "आपल्या व्यवस्थेमध्ये राजकीय मदत आणि इच्छाशक्तीशिवाय काहीही शक्य होत नाही. ४० टक्के मुंबई ही पुनर्प्राप्त (reclaimed) जमीन आहे. त्यामुळे पावसाळ्यात समस्यांचे प्रमाण अधिक असते. मुंबईतील रस्ते अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाहीत, पण आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण गरजेचे आहे, जरी त्यामुळे काही काळ चालण्याला त्रास होत असला तरीही. चालण्याचा अनुभव उपयोगी, सुरक्षित, आरामदायक असला पाहिजे, यासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. तसेच पर्यावरण रक्षणासाठी नाल्यांच्या कडेला बांबूची लागवड केली जात आहे, याचा चालणाऱ्या नागरिकांना फायदा होईल.

‘वॉकिंग प्रोजेक्ट’चे अध्यक्ष आणि सल्लागार आणि सनविन या कंपनीचे सीईओ संदीप बजोरिया म्हणाले की, मुंबईकरांना चांगल्या आणि आरोग्यदायी नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणा, महापालिका तसेच खाजगी संस्थांबरोबर अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून कार्य करीत राहू.

यावेळी मुंबईच्या नागरी विकासात मोलाचे सहकार्य केलेल्या आमला रुईया, डॉ मंजू लोढा, डॉ रती गोदरेज, मयांक गांधी, रमेश आणि पवन पोद्दार, प्रदीप खेरुका, सुशील जीवराजका, आनंदिनी ठाकूर, अजय अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला.

बोरोसिल रिन्युएबल्सचे अध्यक्ष प्रदीप खेरुका म्हणाले की, सरकारकडून काही होण्याची वाट पाहू नका. मुंबईसाठी आवश्यक पादचारी मार्ग सरकारच्या मदतीशिवायही तयार झाले पाहिजेत. असे मार्ग शोधा आणि ते विकसित करण्यासाठी सर्वांनी पुढे या!"

या परिषदेद्वारे मुंबईला अधिक चालण्यायोग्य आणि सायकलस्नेही शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

फुटपाथवरून चालणे अशक्य

उद्योजक सुशील जिवराजका म्हणाले की, ब्रीच कँडीमध्ये दिवसेंदिवस फुटपाथ संकुचित होत आहेत, फरशी आणि पेव्हर ब्लॉकची अवस्था अत्यंत वाईट आहे. १०० मीटर नीट चालणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर "आपण 'वॉक द टॉक' करण्याऐवजी 'टॉक द वॉक' करायला हवे."

logo
marathi.freepressjournal.in