
मित्रांसह सातत्याने फिरायला जाऊन आपल्याला वेळ न दिल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना ग्रँट रोड येथे घडली आहे. अलफीश सय्यद असे या ३२ वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या हत्येनंतर पुरावा नष्ट करून अपघाताचा बनाव करणारा प्रियकर मोहम्मद अब्दुल शेख याला डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी सायंकाळी सहा वाजता ग्रँट रोड येथील एम. एस. अली रोडवरील करंजिया इमारतीमध्ये ही घटना घडली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मोहम्मद राहतो. त्याचे अलफीशशी प्रेमसंबंध होते. ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. अलफीश नागपाडा येथील डंकर रोडच्या लोलीवाला इमारतीमध्ये राहायची. अलफीशला मित्रांसह बाहेर फिरण्याची आवड होती. तिच्या मित्र परिवारात काही मुलांचाही समावेश होत त्यामुळे मोहम्मद तिच्यावर सातत्याने संशय घ्यायचा. बुधवारी याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी रागाच्या भरात मोहम्मदने अलफीशला दांड्याने मारहाण केली. त्या मारहाणीत ती बेशुद्ध झाली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अलफीशला रुग्णालयात दाखल केल्यावर काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. पंचनामा करताना तिच्या शरीरावर अनेक ताज्या जखमा दिसल्या. त्यामुळे मोहम्मदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी मोहम्मदने अलफीशचा अपघात झाल्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच मोहम्मदने गुन्हा कबूल केला. हत्येनंतर आपण पोलीस येईपर्यंत अलफीशचे कपडे धुवून ठेवले तसेच फरशीवर रक्ताचे डाग पुसल्याचे त्याने सांगितले.