राणी बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय

साडेपाच हजार चौरस फूट जागेवर दोन वॉक थ्रू टनेल देशी-विदेशी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार
राणी बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यानात लवकरच काचेच्या टनेलमधून देश-विदेशी रंगबेरंगी माशांसह पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवता येणार आहे. साडेपाच हजार चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे, तर पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची संख्या वाढल्याने आणखी मोकळी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बिंदू ठरले आहे. या प्राणी संग्रहालयात २५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्र बलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्यांचेही राणी बाग आकर्षणाचे केंद्रबिंदू. राणी बागेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुट्टी व शनिवार व रविवारी, तर पर्यटकांचा आकडा ३५ ते ४० हजारांपर्यंत जातो. त्यात आता साडेपाच हजार चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. यात एक टनेल १४ मीटर तर दुसरे टनेल ३६ मीटर लांब असणार आहे.

पेंग्विन कक्षाचा विस्तार!

२६ जुलै २०१६ मध्ये कोरियावरून ८ होबोल्ट पेंग्विन आणले होते. राणी बागेतील पेंग्विन आता बच्चेकंपनीसह मोठ्यांचे आकर्षण ठरत आहे. गेल्या ८ वर्षांत पेंग्विनची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे. पेंग्विनसाठी सध्या २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. परंतु पेंग्विनची संख्या वाढत असल्याने त्यांना जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पेंग्विन कक्षाशेजारी उपलब्ध जागेत ६० चौरस मीटरने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पेंग्विन खेळण्या-बागडण्यासाठी २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे.

राणी बागेत सिंगापूर दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. काचेचे दोन वॉक थ्रू टनेल असून, यातून देश-विदेशातील रंगीबेरंगी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ६० कोटी रुपये खर्च करणार आहे.

- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, प्राणी संग्रहालय, राणीबाग

‘असे’ असणार मत्स्यालय

  • दोन टनेल g एक - १४ मीटर

  • दुसरं - ३६ मीटर g पारदर्शक काचा

  • देशी-विदेशी रंगीबेरंगी मासे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in