
मुंबई : आठ महिन्यांच्या बाळाचा अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहम्मद हासिम अहमद हुसैन सय्यद या २६ वर्षांच्या उत्तरप्रदेशातील तरुणाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. सोमवारी सकाळी अंधेरी रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकाराने तिथे उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मोहम्मद हासिमविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आबिद सय्यद पटेल हे चालक म्हणून काम करत असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील गिल्बर्ट हिल परिसरात राहतात. सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजता ते त्यांच्या पत्नी आणि वहिनीसोबत आठ महिन्याच्या मुलाला वाडिया रुग्णालयात औषधोपचारासाठी घेऊन जात होते. अंधेरी रेल्वे स्थानकात तिकिट काढत असताना अचानक तिथे एक तरुण आला आणि त्यांच्या वहिनीच्या हातातील त्यांचा मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित प्रवाशांसह आरपीएफ पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी बाळाची सुटका केली तर त्याला पुढील चौकशीसाठी अंधेरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तपासात आरोपीचे नाव मोहम्मद हासिम असून तो उत्तरप्रदेशच्या मंजोला, मुराराबाद, जयंतीपूर चौकचा रहिवाशी आहे. अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.