
मुंबई : सोमवारी रात्री मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला कॉल करून धमकी दिल्याप्रकरणी एका वयोवृद्धाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. प्रकाश किशन खेमानी असे या वयोवृद्धाचे नाव असून अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. प्रकाशविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी रात्री दहा वाजता मंत्रालयातील एका अज्ञात व्यक्तीने आगामी होणाऱ्या इव्हेंटमध्ये कॉलर उपस्थित राहत असून त्याचे दशहतवादी कनेक्शन असल्याची माहिती दिली होती. ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. तपासात हा कॉल कांदिवली परिसरातून आला होता, त्यामुळे त्याचा तपास कांदिवली पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकीचा कॉल करून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच एसीपी शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासांत पोलिसांनी प्रकाश खेमानी या वयोवृद्धाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंत्रालयात कॉल केल्याची कबुली दिली.
चौकशीत प्रकाश हा कांदिवलीत राहणाऱ्या खेमानी याच्याविरुद्ध २०१२ आणि जानेवारी २०२३ रोजी कांदिवली पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यांत तो जामिनावर होता. आता त्याने मंत्रालयात धमकीचा कॉल करून तिसरा गुन्हा ओढवून घेतला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि एक सिमकार्ड जप्त केले आहे.