जहांगीर आर्ट गॅलरीत मानवी मुखवट्यांची वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्रप्रदर्शन

हे प्रदर्शन २२ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येणार
जहांगीर आर्ट गॅलरीत मानवी मुखवट्यांची वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्रप्रदर्शन
Administrator

चित्रकार योगेश शिरवडकर ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे १५ वे एकल कलाप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे २२ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. हे प्रदर्शन २२ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकाराने मानवी आयुष्यात त्याला विविध प्रसंगी धारण कराव्या लागणाऱ्या मुखवट्यांची वैशिष्ट्ये प्रसंगानुरूप त्यात आढळणारे वैविध्य यासंबंधी आपल्या चित्रमाध्यमातून प्रकाश टाकला आहे.               

प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण तंत्र व शैलीचा कलात्मक वापर करून तयार केलेली चित्रे ठेवली आहेत. त्यात मानवी जीवनात असणारे विविधलक्षी मुखवट्यांचे महत्व व त्यांची उपयुक्तता यावर आपल्या चित्रमाध्यमातून वैचारिक संकल्पना मांडली आहे. त्यात प्रामुख्याने आनंद, चिंता, भीती, स्वीकार, प्रेम, आवड, दुःख विरह, राग, अगतिकता, पुरुषी अहंभाव तसेच स्त्रीदाक्षिण्य, निजरूप लपविण्याचा व त्याची अन्य रूप प्रकटीकरणाची मानसिकता ह्या विविध मनोविकारांचे रसिकांना दर्शन होते. त्याचप्रमाणे अंतर्मनात असणारे मूळ भाव व मानसिकता ह्यावर विवेचन करतांना त्याने त्यांचे कलात्मक व प्रकात्मक स्वरूपात दर्शन सर्वांना घडवले असून त्यात मुख्यतः मानवी मनातील विकार, अन्य सजीव प्राण्यांचे भावविश्व् आणि त्यांचे असणारे परस्पर भावनिक नाते व विविध टप्प्यावर होणारे त्यांचे प्रकटीकरण व प्रसंगानुसार उत्कट सादरीकरण ह्यांचे फार कलात्मक व बोलके दर्शन सर्वांना घडवले आहे. योग्य रंगांच्या लेपनातून व त्यांच्या कलात्मक थरांमधून त्याने येथे सादर केलेली मुखवट्यांची अनेक भावपूर्ण रूपे खरोखर विलक्षण व मनोवेधक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in