
मुंबई : इलेक्ट्रिक बिल अपडेट करण्याचा मेसेज पाठवून एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. या ठगाविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
८० वर्षांचे वयोवृद्ध नवीनचंद्र विनायक साळवे हे कुर्ला येथे राहत असून ते एका खासगी कंपनीत निवृत्त झाले आहेत. शनिवारी सकाळी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्यात त्यांच्या फ्लॅटचे इलेक्ट्रीक बिल अपडेट नसल्याने रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या फ्लॅटचे इलेक्ट्रिक सप्लाय बंद होणार असल्याचे नमूद करुन त्यात एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे त्यांनी या मोबाईलवर संपर्क साधून त्यांचे बिल भरल्याचे सांगितले. यावेळी या व्यक्तीने बिल अपडेटसाठी १२ रुपये जमा करा, नाहीतर त्यांना ९० हजार रुपयांचे दंड भरावे लागेल. त्यानंतर त्याने त्यांना व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठविली होती. त्याच्या सांगण्यावरुन त्यांनी ती लिंक ओपन करुन १२ रुपये ऑनलाईन पाठविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्यांच्या मोबाईलवर काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे मेसेज आले होते. ते पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यातून सुमारे पावणेदोन लाख रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले.