मुंबईकरांच्या चिंतेत वाढ,कोरोना मृतांची संख्या दुप्पट

बीए.२ आणि त्याचे उपप्रकार यापासून होणारा संसर्ग सौम्य असल्याचे आढळले आहे.
मुंबईकरांच्या चिंतेत वाढ,कोरोना मृतांची संख्या दुप्पट

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच मृतांच्या संख्येतही काही अंशी वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला होता. जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून ही संख्या जवळपास दुपटीहून जास्त वाढून १६वर गेली. राज्यभरात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढायला सुरुवात झाली. ओमायक्रॉनच्या बीए.२ उपप्रकाराचा प्रसार राज्यभरात जास्त असून त्याखालोखाल आता बीए.४ आणि बीए.५ यांचे रुग्णही आढळत आहेत. बीए.२ आणि त्याचे उपप्रकार यापासून होणारा संसर्ग सौम्य असल्याचे आढळले आहे.

बीए.४ आणि बीए.५ या उपप्रकारांचे आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्येही कोरोनाची तीव्रता सौम्य असल्याचे निदर्शनास आले आहे; परंतु दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे, त्या तुलनेत काही अंशी मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे आढळले आहे. ३० मे ते ५ जून या काळात राज्यभरात सात मृत्यूंची नोंद झाली होती. यामध्ये तीन मृत्यू मुंबईत, तर नाशिक, पुणे महानगरपालिका, सोलापूर आणि बीड येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यानंतर दोन आठवड्यातच, १३ ते १९ जून या काळात मृतांच्या संख्येत जवळपास दुपटीहून जास्त वाढ होऊन १६ मृत्यू नोंदले गेले. या काळात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येतही जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.

रुग्णसंख्येचा आलेख दोन हजारांहून चार हजारांवर गेला. मुंबईतही हीच स्थिती असून दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारावरून दोन हजारांवर गेली. परिणामी, मुंबईतील मृतांच्या संख्येतही वाढ झाल्याचे आढळले आहे. या काळात मुंबईत दहा (सुमारे ६० टक्के) मृत्यू नोंदले गेले. विशेष म्हणजे, या काळात अन्य जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा प्रसार वाढल्याने सुमारे ४० टक्के मृत्यू हे अन्य जिल्ह्यांत झाले आहेत. या काळात रायगडमध्ये दोन तर ठाणे, वसई-विरार महानगरपालिका, जळगाव आणि सातारा येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. २० ते २५ जून या सहा दिवसांत राज्यभरात १४ मृत्यू नोंदले असून यातील ११ मृत्यूची नोंद मुंबईत झाली आहे. राज्यभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी बहुसंख्य रुग्ण हे ६० वर्षांवरील असून या रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी दीर्घकालीन आजार असल्याचे आढळले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in