अंधेरी पोटनिवडणूक शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी दाखल, भाजप, ठाकरे गटाच्या प्रचाराला रंग चढणार
ANI

अंधेरी पोटनिवडणूक शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी दाखल, भाजप, ठाकरे गटाच्या प्रचाराला रंग चढणार

उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने लटके यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला.
Published on

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी, तर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. शिवसेनेतील बंडखोरी, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. दोन्ही गटांचे उमेदवार ठरल्याने पहिला अंक आता संपला आहे. आता दोन्ही बाजूंकडून प्रचाराला खरा रंग चढणार आहे. दोन्ही बाजूचे नेते हिरिरीने प्रचारात उतरणार आहेत.

ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरता येणार की नाही, यावर चर्चा झाल्या. महापालिकेतील त्यांच्या राजीनाम्याचे प्रकरण थेट न्यायालयाच्या निर्णयानंतरच निकाली निघाले. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने लटके यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे ही निवडणूक भाजप लढणार की बाळासाहेबांची शिवसेना, याचा उलगडा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत झाला नव्हता. अखेर भाजपचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल हे अर्ज भरणार, हे निश्चित झाले. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती करून ही निवडणूक लढणार आहे. ऋतुजा लटके यांचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या कम्युनिस्ट पक्षानेही शिवसेना ठाकरेला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे मुरजी पटेल यांनीही शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, नितेश राणे हे उपस्थित होते. निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याने तांत्रिक अडचण नको म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांनी, तर मुरजी पटेल यांनी दोन अर्ज भरले आहेत. या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.

मविआ, सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांसाठी तसेच भाजपसाठी ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याची आशा आहे, तरी भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना या दोघांनीही निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवली आहे. या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणात तर उमटणार आहेतच; पण त्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठीही हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in