
मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत अभिना संजनवालिया या ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य सहाजण जखमी झाले. जखमींमध्ये एका १० दिवसांच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरातील अशोक अकॅडमी लेनमधील आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १०४ मध्ये शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. घरात धुराचे साम्राज्य पसरले. तोपर्यंत आगीचे लोळ इतर घरांमध्येही पसरले. रहिवाशांनी आरडाओरडा करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. अनेकजण सुरक्षितरीत्या घराबाहेर पडले. मात्र, आग आणि धुरामुळे काही रहिवाशांना बाहेर पडता आले नाही. या आगीमध्ये अपर्णा गुप्ता (४१), दया गुप्ता (२१), रीहान गुप्ता (३), प्रदुमना (१० दिवस), अभिना संजय वालिया (३४), कार्तिक संजय वालिया (४०), पोलम गुप्ता (४०) आदी अडकले होते.
अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा करत इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. धुरात गुदमरल्यामुळे सर्वांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. काहींना कोकिलाबेन तर काहींना कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. अभिना संजय वालिया यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर पोलम गुप्ता यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून अन्य जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.