

मुंबई : अंधेरी पूर्व मरोळ येथील पालिकेचे सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी उद्योगपतीला विकण्याचा घाट घातला जात आहे. मात्र पालिकेच्या या निर्णयाला अंधेरी विकास समितीसह सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्र येत कडाडून विरोध केला आहे. यासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटल येथे गुरुवारी शेकडो कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे कार्याध्यक्ष दिलीप माने व अध्यक्ष माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी केले.
पालिकेने कॅन्सर रुग्णांसाठी या जागी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. १९९२ साली या रुग्णालयाच्या बांधकामासाठी तत्कालीन महापौर चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. पण निधीअभावी रुग्णालय बांधून विशाखापट्टणम येथील सेव्हन हिल्स या संस्थेला रुग्णालय चालवण्यासाठी देण्यात आले होते. २०१० मध्ये हे रुग्णालय बांधून रुग्णांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले. परंतु व्यवसायातील नुकसानीमुळे सदर संस्था दिवाळखोरीत गेली. त्यामुळे संस्था पालिकेचे पैसे देऊ शकली नाही, त्यामुळे पालिकेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे २०२० मध्ये या रुग्णालयाचा ताबा पालिकेकडे आला आहे. कोविडच्या काळात या रुग्णालयाचा वापर रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेला झाला होता.
कोविडच्या काळात नागरिकांसाठी जीवनदान देणारे हे रुग्णायल ठरल्यामुळे नागरिकांनी धरणे आंदोलन पुकारले होते. यावेळी कार्याध्यक्ष दिलीप माने यांनी मोर्चाला संबोधित केले. मरोळ अंधेरी पूर्व हा भाग प्रामुख्याने गरीब व मध्यमवर्गीयांचा भाग असल्याचे सांगून २०१० मध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या सेव्हन हिल्स या रुग्णालयाचा फायदा आत्तापर्यंत विभागातील बऱ्याच गरीब रुग्णांना मिळालेला आहे, त्याचा आवर्जून उल्लेख केला. हे रुग्णालय मुंबईस्थित खासगी उद्योगपतीला विकण्यात येणार, अशी बातमी समोर आल्यामुळे अंधेरीतील जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे त्यांनी सांगितले.
सेव्हन हिल्स हे आशिया खंडातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये गणले जाणारे रुग्णालय आहे. त्यामध्ये साधारण १५०० बेड, ३६ विविध ऑपरेशन थिएटर, १२० आयसीयू, तसेच स्टाफ क्वार्टर्स असे एकूण १७ एकरमध्ये अद्ययावत असे रुग्णालय स्थापन झालेले आहे. असे रुग्णालय एखाद्या खासगी उद्योगपतीकडे गेल्यानंतर ते पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये रूपांतरित होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना तेथे उपचार मिळणे तर दूरच, परंतु आतमध्ये प्रवेशदेखील मिळणार नाही, ही रास्त भीती असल्यामुळे अंधेरी विकास समितीने पुढाकार घेऊन स्थानिक जनतेच्या सहकार्याने गुरुवारी मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले.
पालिकेने रुग्णालय चालवावे - राजेश शर्मा
सेव्हन हिल्स रुग्णालय खासगी उद्योजकाला साधारणपणे ३०० ते ४०० कोटी रुपये किमतीला विकले जाण्याची शक्यता आहे. मात्र ७० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेला हे रुग्णालय चालवण्यास कसलीच अडचण नाही. रुग्णालय चालविण्यासाठी महिना साधारण ५० कोटी खर्च अपेक्षित आहे. मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम रुग्णालय व शीव रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय चालविण्याबरोबरच येथे वैद्यकीय व परिचारिका अभ्यासक्रम सुरू केल्यास गरीब रुग्णांबरोबरच विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होईल. मुंबई महानगरपालिकेनेच हे रुग्णालय चालवावे, असे अंधेरी विकास समितीचे अध्यक्ष राजेश शर्मा यांनी सांगितले.