
वर्षानुवर्षे जलमय होणारा अंधेरी सब वे पूरमुक्त होणार आहे. मोगरा नाल्याचे रुंदीकरणाबरोबर नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच अंधेरी सब वे पूरमुक्त होणार असून या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल ७६ लाख रुपये खर्च करणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात हिंदमाता, गांधी मार्केट, मिलन सब वे, अंधेरी सब वे जलमय होतो. परंतु पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी हिंदमाता व गांधी मार्केट परिसरात भूमिगत पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हिंदमाता गांधी मार्केट परिसर पूरमुक्त झाल्याचे समाधान स्थानिक दुकानदार व नागरिकांनी व्यक्त केले. मिलन सब वे पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी भूमिगत टाक्या बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी येथेही दिलासा मिळेल, असा विश्वास पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाने व्यक्त केला आहे.
सबवेची ही समस्या लक्षात घेऊन पालिकेने अंधेरी पूर्वेकडून एस. व्ही. रोड, विरा देसाईमार्गे समुद्राकडे जाणाऱ्या मोगऱ्या नाल्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच वीरा देसाई मार्ग आणि जे. पी. रोडवर अतिरिक्त पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. निविदेच्या प्रशासकीय प्रक्रियेला महिनाभराचा कालावधी लागणार असून प्रशासकाच्या मंजुरीनंतर ऑगस्ट अखेरपर्यंत या कामाचा शुभारंभ होईल, असा अंदाज आहे.