पावसाळ्यात अंधेरी सबवे २८ वेळा पाण्याखाली, मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता वाढवा; अमित साटम यांचे पालिका अतिरिक्त आयुक्तांना पत्र

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बरसणाऱ्या पावसामुळे अंधेरी सबवे आतापर्यंत तब्बल २८ वेळा पाण्याखाली गेला. तर १५ मिनिटे ते चार तास सब वे वाहतुकीसाठी बंद करावा लागला, अशी माहिती भाजपचे आमदार अमित साटम यांनी दिली आहे.
पावसाळ्यात अंधेरी सबवे २८ वेळा पाण्याखाली, मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता वाढवा; अमित साटम यांचे पालिका अतिरिक्त आयुक्तांना पत्र
Published on

मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बरसणाऱ्या पावसामुळे अंधेरी सबवे आतापर्यंत तब्बल २८ वेळा पाण्याखाली गेला. तर १५ मिनिटे ते चार तास सब वे वाहतुकीसाठी बंद करावा लागला, अशी माहिती भाजपचे आमदार अमित साटम यांनी दिली आहे. अंधेरी सबवे पूरमुक्तीसाठी हिंदमाताच्या धर्तीवर उच्च क्षमतेची भूमिगत पाणीसाठवणक टाकी बसवणे, मलनिस्सारण जलवाहिन्यांची क्षमता वाढवणे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प क्षमतेने राबवणे, अशा प्रकारच्या सूचना भाजपचे स्थानिक आमदार अमित साटम यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना पत्राद्वारे केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी सबवे पाण्याखाली जातो. यामुळे सबवेतील वाहतूक ठप्प होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.‌ सबवेत जमा होणारे पाणी भूमिगत पाण्याच्या टाकीत जमा करणे आणि पाऊस ओसरला की, समुद्रात सोडणे यामुळे सबवेत पाणी जमा राहणार नाही.‌ सबवे पूरमुक्तीसाठी ८ ऑगस्ट रोजी अंधेरी सबवे येथे पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या पूरस्थिती कारणांचा अभ्यास करण्यासाठी स्टाॅम वाॅटर ड्रेनेज आणि प्रभाग अधिकाऱ्यांसह अंधेरी सबवेची पहाणी केली. यात पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी मायक्रो-टनेलिंग योजनेवर ६०० कोटी रुपयांचा खर्च करणे हे व्यवहार्य नसल्याचे साटम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे स्टाॅम वाॅटर ड्रेनेज विभागालाही ही योजना अव्यवहार्य असल्याचे आढळल्याचे साटम यांनी सांगितले.

आमच्या अंधेरी सबवे भेटीदरम्यान पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भुयारी मार्गात पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. पालिका प्रशासनाने पूर्वेकडील बाजूस जमिनीच्या खाली किंवा इतर कोणत्याही मोकळ्या जागेवर किंवा रस्त्याच्या खाली एक भूमिगत टाकी बांधावी. ज्यामुळे पूर्वेकडून पावसाचे येणारे पाणी हे मिलन सबवेप्रमाणे भूमिगत टाकीमध्ये जमा होईल, असे साटम म्हणाले.

भूमिगत पाण्याची टाकी बसवण्याचा उपाय

भूगर्भीय सर्वेक्षण आणि आयआयटी तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर बीएमसीने शक्य तितके पाणी शोषून घेण्यासाठी स्टॉर्मवॉटर ड्रेनमध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कार्यवाही करावी, अशी सूचनाही साटम यांनी केली. तसेच एस. व्ही. रोडवरील पर्जन्य जलवाहिन्या नेटवर्कची क्षमता वाढवणे, पूर्वेकडील सांडपाणी पाणी कमी करण्यासाठी मलनिस्सारण नेटवर्क क्षमता वाढवणे, आणि मिलियनेअर बिल्डिंगपासून सुरू होणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण करणे आदी सूचनांचा समावेश असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले. भूमिगत पाणी साठवण टाकी, पर्जन्य व मलनिस्सारण जलवाहिन्यांची क्षमता वाढवणे यासारख्या उपाययोजना केल्या तरी अंधेरी सबवे पाण्याखाली जाण्यापासून काहीसा दिलासा मिळेल, असे साटम यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in