

मुंबई : मुंबईच्या अंधेरी (पूर्व) येथील भूमिगत टी-२ विमानतळ मेट्रो स्थानकात बुधवारी दुपारी ४.१० वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले असून, कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दलाच्या दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो स्थानकातील तांत्रिक खोलीत आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच दुपारी ४.१३ वाजता अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि दोन जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ४.३० पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानकात दाट धूर पसरल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना श्वसनयंत्राचा वापर करावा लागला.
या घटनेमुळे मेट्रो अॅक्वा लाईन ३ च्या भुयारी मार्गावरील आरे जेव्हीएलआर आणि कफ परेड दरम्यानची मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'ने या घटनेला किरकोळ धुराची घटना असल्याचे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ स्थानकावरील परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ गाड्या या स्थानकावर थांबल्या नाहीत. सहार रोड आणि आरे स्थानकांदरम्यानच्या सेवेवर तात्पुरता परिणाम झाला होता, मात्र सर्व आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात आले असून आता सामान्य सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याआधी नोव्हेंबर २०२४ मध्ये बीकेसीतील भूमिगत मेट्रो स्थानकाच्या तळघरात आग लागली होती.