भर उन्हात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

मैदानात लाखोंच्या संखेने आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आता शेकडोंच्या संख्येने विभागीय प्रतिनिधी स्वरूपात सहभागी होत आंदोलन करत आहेत.
भर उन्हात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

मुंबई : गेल्या दिड महिन्यापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी राज्यभर संप पुकारला आहे. माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आझाद मैदानात येऊन आश्वासन देऊन गेले; मात्र अद्यापही मागण्या बाबत सरकारने काहीच कार्यवाही केली नाही. अंगणवाडी महिला आजही मैदानात आहेत. त्यांनी भर दुपारी तळपत्या उन्हात आक्रमक होत काळे वस्त्र दाखवत सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.

मैदानात लाखोंच्या संखेने आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आता शेकडोंच्या संख्येने विभागीय प्रतिनिधी स्वरूपात सहभागी होत आंदोलन करत आहेत. वातावरण बदल पाहता सकाळी गारवा असतो; मात्र दुपारी कडक उन्हात या महिला काळ्या ओढणी घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करत होत्या. या महिला चांगल्याच आक्रमक झल्या होत्या.

मागण्या मान्य करण्यास काय अडचण आहे?

घरभाडे अभावी अंगणवाडी चालवणे अवघड होत आहे. मोबाईलवर नोंदी करणे, प्रवास भत्ता, या व इतर समस्या आहेतच; मात्र बालकांना ८ रुपयात दोन वेळेचा आहार देण्याचे सरकारने नियोजन केले आहे. म्हणजे एका वेळेस ४ रुपये. ४ रुपयात कोणता आहार मिळतो? का नाही बालके कुपोषित होणार. ज्याकिट कोट घालून जाहिरातीवर, विमान प्रवासावर, कोटावर, सुशोभिकरणावर करोडो रुपये खर्च होत आहेत. कोरोना काळात आम्ही सेवा केली. आमच्या सर्व सुट्या रद्द करून आम्हाला सरकारी कारभारासाठी जुंपणाऱ्या सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यास काय अडचण आहे? असा सवाल महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष संगीता कांबळे यांनी सरकारला केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in