मुंबई-गोवा मार्ग अपूर्ण, टोलची तयारी मात्र पूर्ण; कोकणातील नागरिकांमध्ये संताप

रायगड आणि कोकणच्या विकासाला जोडणारा आणि कोकणवासीयांसाठी जीवनरेखा मानला जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अजूनही पूर्णपणे तयार झालेला नसताना आता या मार्गावर टोल नाके सुरू करण्याची तयारी सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा मार्ग अपूर्ण, टोलची तयारी मात्र पूर्ण; कोकणातील नागरिकांमध्ये संताप
मुंबई-गोवा मार्ग अपूर्ण, टोलची तयारी मात्र पूर्ण; कोकणातील नागरिकांमध्ये संताप
Published on

पेण (अरविंद गुरव) 

रायगड आणि कोकणच्या विकासाला जोडणारा आणि कोकणवासीयांसाठी जीवनरेखा मानला जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अजूनही पूर्णपणे तयार झालेला नसताना आता या मार्गावर टोल नाके सुरू करण्याची तयारी सुरू झाल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ता, सुरू असलेली बांधकामे, अपुऱ्या सुविधा आणि वाहतुकीच्या अडचणी यामुळे आधीच त्रस्त असलेल्या वाहनचालकांना आता तिहेरी टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर व माणगाव बायपासचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे दोन्ही शहरांच्या बाजारपेठांमध्ये दररोज प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्यातच पळस्पे ते पोलादपूर दरम्यान तीन टोल नाके सुरू करण्याचा प्रस्ताव असून पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किलोमीटर अंतरात खारपाडा आणि खांब येथे दोन टोलनाके उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एका प्रवासात दोन वेळा टोल भरावा लागणार आहे. या घडामोडींमुळे “रस्ता अपूर्ण असतानाही टोल कशासाठी ?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य प्रवासी, पर्यटक, नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाशी नाका ते उंबर्डे फाटा धोकादायक सर्विस रोड आहे. या ठिकाणी उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवण्याची मागणी अनेक वर्ष सुरू आहे. परंतु त्याकडे अधिकारीवर्ग लक्ष देत नाहीत. याठिकाणी रस्ता ओलांडताना अनेक प्रवाशांचे अपघात झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अक्षरशः उड्डाण पुलावर देखील ओव्हरलोड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणात होत आहे या बेकायदेशीर ओव्हरलोड पार्किंगमुळे अनेक अपघात होतात.

पेणमधील चीनची भिंत म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करावे अशी मागणी सातत्याने होत असते. पेण शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर जाण्याकरिता एसटी गाड्यांना व मोठ्या गाड्यांना अक्षरशः कसरत करावी लागते. सदरचा कनेक्टिंग रोड रुंद व सुव्यवस्थित करण्यात यावा, अशी मागणी ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टोलचे दर अद्याप जाहीर नाहीत

टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत याबाबत अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात असून याबाबत अधिकृत माहिती नॅशनल हायवे प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळेल अशी चर्चा सुरू आहे. या मार्गावर टोल सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१७ वर्षांपासून रखडलेले काम

मुंबईगोवा महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रुंदीकरणाचे काम २०१० साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्यांमधील अडथळे, भूसंपादनातील विलंब आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वारंवार अडचणीत सापडत गेले. नागोठणे आणि कोलाड परिसरातील काही पुलांची कामे अजूनही सुरू आहेत. तसेच माणगाव आणि इंदापूर आणि येथील बायपास रस्त्यांची कामेही पूर्ण झालेली नाहीत.

रायगडवासीयांना मुंबई गोवा महामार्गावर टोलमाफी द्या तसेच हिंदी भाषेतील महामार्गावरील सर्व फलके मराठी भाषेत लावा अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी केली आहे.  शिवाय स्थानिक रायगडवासियांना टोलमाफी न मिळाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निकृष्ट रस्ते, सुविधांची बोंब

  • पळस्पे ते इंदापूर या दरम्यान अनेक गावांना जोडणारे उपमार्ग आहेत. मात्र या गावांकडे जाणारे बहुतांश रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. काही ठिकाणी तर केवळ ब्लॉक टाकून तात्पुरते मार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

  • महामार्गावर अजूनही प्रसाधनगृह, विश्रांतीगृह, पिण्याचे पाणी, स्ट्रीट लाइट, चार्जिंग सुविधा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. असे असताना टोल वसुली करणे योग्य नाही, अशी तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in