अनिल अंबानी यांच्याविरोधात ED कडून गुन्हा दाखल; SBI ची २९२९ कोटी रुपयांची फसवणूक

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) संबंधित तब्बल २९२९ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि इतरांविरोधात ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचलनालय) मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे.
अनिल अंबानी यांच्याविरोधात ED कडून गुन्हा दाखल; SBI ची २९२९ कोटी रुपयांची फसवणूक
Published on

आशीष सिंह / मुंबई :

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) संबंधित तब्बल २९२९ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि इतरांविरोधात ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचलनालय) मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील महिन्यात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीने कारवाई केली. सीबीआयने अंबानी, आरकॉम आणि काही सरकारी अधिकाऱ्यांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये एसबीआयला मोठे नुकसान झाल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान अंबानींच्या घरावर आणि आरकॉमच्या कार्यालयांवर झडतीही घेण्यात आली होती.

एसबीआयने १३ जून रोजी अंबानी आणि आरकॉमला “फसवणूक” असे घोषित करून २४ जून रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे अहवाल सादर केला होता.

अंबानींच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही तक्रार दहा वर्षांपूर्वीच्या घटनांशी संबंधित आहे. तेव्हा अंबानी हे अकार्यकारी संचालक होते आणि दैनंदिन व्यवस्थापनात त्यांचा काही सहभाग नव्हता. “एसबीआयने पाच इतर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्सविरुद्धची कार्यवाही आधीच मागे घेतली आहे. तरीदेखील अंबानी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी एसबीआयच्या नेतृत्वाखालील पतपुरवठादारांच्या समितीच्या देखरेखीखाली असून तिचे व्यवस्थापन रिझोल्युशन प्रोफेशनलच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ही बाब सध्या एनसीएलटी आणि इतर न्यायालयीन मंचांमध्ये प्रलंबित आहे. अंबानी यांनी एसबीआयच्या घोषणेला सक्षम न्यायालयीन मंचात आव्हान दिले आहे. ते सर्व आरोप फेटाळून लावत असून स्वतःचा बचाव करतील, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

या नव्या गुन्हयामुळे ‘ईडी’च्या अंबानी आणि त्यांच्या समूह कंपन्यांविरोधातील तपासाचा विस्तार आता चार प्रकरणांपर्यंत वाढला आहे. एसबीआय प्रकरणाव्यतिरिक्त, या संस्थेकडून येस बँकेशी संबंधित सुमारे ३ हजार कोटींच्या कर्ज वळवणीचा तपास सुरू आहे. यात २०१७ ते २०१९ दरम्यान रिलायन्स समूह कंपन्यांनी निधी वळवल्याचा संशय आहे. या तपासात ३५ पेक्षा जास्त ठिकाणांवर धाडी, ५० कंपन्यांमध्ये शोधमोहीम आणि किमान २५ व्यक्तींची चौकशी झाली आहे.

तसेच, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर समूह कंपन्यांकडून सुमारे १७ हजार कोटींची संशयास्पद कर्ज वळवणी इंटर-कार्पोरेट डिपॉझिट्समार्फत केल्याची चौकशी सुरू आहे. याशिवाय रिलायन्स पॉवर आणि बिस्वाल ट्रेडलिंक प्रा. लि. (बीटीपीएल) यांच्याशी संबंधित ६८.२ कोटींच्या बनावट बँक हमीपत्रांचा मुद्दा देखील या मोठ्या १७ हजार कोटींच्या फसवणूक तपासाचा भाग आहे.

एसबीआय प्रकरणामध्ये कर्जसुविधा मिळवण्यासाठी चुकीचे सादरीकरण, कर्ज निधींचा दुरुपयोग, आंतर-कंपनी व्यवहार, इन्व्हॉइस फायनान्सिंगचा गैरवापर, बिले डिस्काउंट करणे आणि खोटे देणेकरी निर्माण करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. आरोपींवर फौजदारी कट, फसवणूक आणि विश्वासघाताचे आरोप ठेवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in