
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात देशमुख सध्या सीबीआय कोठडीत असून, प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असून उच्च रक्तदाब आणि खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काही महिन्यांपूर्वी विख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्यापासून ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले खंडणी आणि मनीलाँड्रिंग प्रकरण, तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांचे नाव गोवले जात आहे. त्यातच सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याचे ठरवल्याच्या पुढच्याच दिवशी अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, एका खासगी रुग्णालयात खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मागणारी देशमुख यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. “अनिल देशमुख यांना परळ येथील केईएम रुग्णालयात अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि छातीत दुखण्याच्या कारणास्तव आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचारांवर तसेच प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे,” असे रुग्णालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.