अनिल देशमुखांची जामिनासाठी हायकोर्टात धाव

 
अनिल देशमुखांची जामिनासाठी हायकोर्टात धाव

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हायकोर्टात धाव घेऊन नियमित जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. २१ एप्रिल रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून त्यानंतर १२ तास चौकशी केल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. याआधी सत्र न्यायालयाने १७ जानेवारी रोजी देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला होता. मात्र, अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी १८ मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात देशमुख यांनी हायकोर्टात यचिका दाखल करून आव्हान देताना जामीन मिळावा, अशी विनंती केली आहे.

अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय असल्याचे उपलब्ध पुराव्यांतून स्पष्ट होत असल्याचे सांगताना विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी देशमुखांनी त्यांच्या कार्यकाळात अवाजवी दबाव टाकत पोलीस दलातील बदल्या व नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केला, असे निरीक्षण नोंदवत जामीन अर्ज फेटाळला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in