अनिल देशमुखांनवर जेजे रूग्णालयातच खांद्यावर शस्त्रक्रिया

अनिल देशमुखांनवर जेजे रूग्णालयातच खांद्यावर शस्त्रक्रिया

आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला. जेजे रूग्णालयात अद्ययावत वैद्यकिय सुविधा असल्याने तेथेच उपचार घ्या, असे आदेश देत न्यायमूर्ती राहूल रोकडे यांनी देशमुख यांचा अर्ज फेटाळून लावला.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. २१ एप्रिल रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून त्यानंतर १२ तास चौकशी केल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली आणि त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुखांनी सत्र न्यायालयात नव्याने अर्ज दाखल केला आहे. आपल्याला अनेक शारीरिक आजार आहेत. तसेच सरकारी जेजे रुग्णालयात उपचाराच्या सोयी सुविधांचा अभाव आहे. अपुऱ्या सुविधामुळे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला त्या अर्जावर न्यायमूर्ती रोहूल रोकडे यांच्या समोर सुनावणी झाली.

यावेळी ईडीने अर्जाला जोरदार विरोध केला. जे. जे. रुग्णालयात अद्ययावत सुविधा असल्याने खासगी रूग्णालयात उपचार करण्याची गरज नसल्याचा दावा ईडीने केला. तर देशमुख यांच्यावर तातडीने वैद्यकिय उपचार करण्याची गरज नसल्याचा अहवाल जे.जे.तील डॉक्टरांनी सादर केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय न्यायालयाने जाहिर केला. देशमुख यांचा अर्ज फेटाळून लावताना न्यायालयाने देशमुख यांना जे. जे. रूग्णालयातच वैद्यकिय उपचार घेण्याचे आदेश दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in