अनिल देशमुखांच्या जामिनावर आज फैसला होणार

मुंबई उच्च न्यायालयाला देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत
अनिल देशमुखांच्या जामिनावर आज फैसला होणार

मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाचा फैसला बुधवार, ४ ऑक्टोबरला ठरणार आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जावर गेल्या आठवडयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय दुपारी जाहीर करणार आहे.

मनी लाँड्रिग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, उच्च न्यायालयात न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सलग सुनावणी सुरू झाली. यावेळी देशमुखांविरोधात तपास यंत्रणेकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांची अटक अयोग्य असल्याचा दावा करताना देशमुख यांचे वय आणि त्यांचे आजारपण या मुद्यावर जामीन देण्याची विनंती करण्यात आली आहे. तर देशमुख यांची अटक ही योग्य आणि कायद्याला धरूनच असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयने (ईडी) केला आहे. तसेच वसूली आणि पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या प्रकरणातही देशमुखांनी हस्तक्षेप केल्याचा दावाही ईडीने केला आहे. तेव्हा, दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in