अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील यांना दिलासा ;दहा वर्षांकरिता पासपोर्ट नूतनीकरण करण्यास परवानगी

सलील यांनी पासपोर्ट नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पासपोर्ट ईडीकडे सुपूर्द करावा, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले .
अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील यांना दिलासा 
;दहा वर्षांकरिता पासपोर्ट नूतनीकरण करण्यास परवानगी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना विशेष न्यायालयाने दिलासा दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सलील यांना दहा वर्षांकरिता पासपोर्ट नूतनीकरण करण्यास मुभा दिली.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे मुख्य आरोपी असलेल्या १०० कोटींच्या आर्थिक अफरातफर प्रकरणाची सुनावणी बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालय राहुल रोकडे यांच्यापुढे झाली. यावेळी सध्या जामिनावर बाहेर असलेले आरोपी संजीव पालांडे यांनी जामिनाच्या अटींना अनुसरून मुंबईबाहेर जाण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. त्यांच्यातर्फे अ‍ॅड. साईरुचिता चौधरी यांनी यासंदर्भात अर्ज केला. याचवेळी सलील देशमुख यांच्या वतीने अ‍ॅड. इंद्रपाल सिंग यांनी अर्ज केला.

अ‍ॅड. सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन निवाड्यांचा संदर्भ देत ईडीच्या ताब्यातील पासपोर्ट मिळवून तो दहा वर्षांकरिता नूतनीकरण करण्यासाठी परवानगी मागितली. त्यावर न्यायालयाने संजीव पालांडे यांना धार्मिक हेतूसाठी मुंबईबाहेर प्रवास करण्यास सशर्त मुभा दिली. त्याचबरोबर पासपोर्ट नूतनीकरण करण्यासाठी सलील देशमुख यांना परवानगी दिली. सलील यांनी पासपोर्ट नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पासपोर्ट ईडीकडे सुपूर्द करावा, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले .

logo
marathi.freepressjournal.in