मुंबई : अनिल डिग्गीकर यांनी १४ मार्च रोजी बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अनिल डिग्गीकर यांनी बी.ई (स्थापत्य अभियांत्रिकी) या विषयात पदवी संपादन केली असून, ते १९९० च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.
त्यांनी १९९० मध्ये रत्नागिरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. डिग्गीकर यांनी अनेक कार्यकारी पदे भूषविली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (महाऊर्जा) महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव व विशेष कार्य अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडको महामंडळ उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत.