

मुंबई : ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचे गुरुवारी सकाळी दुःखद निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल कालेलकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९४७ रोजी वांद्रे येथे झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण दादरमधील छबीलदास हायस्कूलमध्ये झाले. तर पुढील शिक्षण वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. ते अविवाहित होते.
अनिल यांनी गेली ४० हून अधिक वर्षे दूरदर्शन मालिकांसाठी सातत्याने लेखन केले. ‘तिसरा डोळा’, ‘कमांडर’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका होत्या. कथा, पटकथा, संवाद या तिन्ही प्रांतांमध्ये अनिल यांनी मोठे योगदान दिले आहे. तर ‘दुनिया गेली तेल लावत’, ‘आता माझी हटली’, ‘होते होते प्यार हो गया’, ‘कोई किसी से कम नही’ या चित्रपटांना अनिल यांच्या लेखणीचा स्पर्श लाभला आहे.
अनिल कालेलकर यांचे लेखनकार्य अत्यंत बहुआयामी आणि अपूर्व असे होते. त्यांनी २५ पेक्षा अधिक हिंदी, मराठी आणि गुजराती चित्रपटांचे लेखन केले आहे. तसेच २५ पेक्षा अधिक हिंदी, मराठी, गुजराती मालिकांचेही लेखन केले.
त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराला अभिनेता चेतन दळवी, कुमार सोहोनी, प्रमोद पवार, दिग्दर्शक सतीश रणदिवे, रमेश साळगावकर, नंदू आचरेकर, सतीश रणदिवे, प्रमोद पवार, निलय वैद्य, गणेश गारगोटे, दिग्दर्शक विजय राणे, श्रीनिवास नार्वेकर, सिध्देश चौधरी, गौरी चौधरी, परी तेलंग, मनोहर सरवणकर, उमेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.