गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार; आमदार अनिल परब यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

कांदिवली येथील ‘सावली बार अँड रेस्टॉरंट’वर ३० मे रोजी समतानगर पोलीस ठाणे आणि युनिट नंबर १२ च्या पोलिसांनी डान्सबार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने छापा टाकला.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार; आमदार अनिल परब यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Published on

मुंबई : कांदिवली येथील ‘सावली बार अँड रेस्टॉरंट’वर ३० मे रोजी समतानगर पोलीस ठाणे आणि युनिट नंबर १२ च्या पोलिसांनी डान्सबार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने छापा टाकला. या छाप्यात २२ बारबाला, १२ ग्राहक आणि ४ कर्मचाऱ्यांना अटक केली. पंचनाम्यानंतर सर्व कारवाई पूर्ण झाल्यावर पोलिसांच्या स्टेटमेंटमध्ये या डान्सबारचे परमिट गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत शुक्रवारी केला.

विधान परिषदेत अनिल परब यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वाळू उपसा करून ती गरिबांऐवजी राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांच्या घशात जात असल्याचा आरोपही केला. तसेच ‘सावली बार अँड रेस्टॉरंट’ गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे असल्याचा गौप्यस्फोट केला. या आरोपाने संपूर्ण सभागृह अचंबित झाले.

एखादा मंत्री त्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का, असा सवाल परब यांनी केला. आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले. मात्र, आता डान्सबारला प्रोत्साहन देण्याचे काम गृह राज्यमंत्र्यांच्या घरातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी सरकारने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी परब यांनी केली.

वाळू उपशावर परब म्हणाले, रत्नागिरीतील जगबुडी नदीतून अवैध गाळ आणि वाळू उपसा सुरू आहे. हा गाळ योगिता दंत विद्यालयात टाकला जात आहे. महसूल राज्यमंत्री यात संचालक होते. योगेश कदम यांच्या बहिणीच्या नावाने ते आहे. त्यांच्या वडिलांचे नावही संचालक मंडळावर आहे. रत्नागिरीत महसूल राज्यमंत्री यांच्या कृपेने अवैध उपसा सुरू आहे. वाळू काढल्यानंतर पहिल्यांदा गरिबांना वाळू देण्याचे धोरण आहे. मात्र, असे न करता ही वाळू थेट महसूल राज्यमंत्र्यांच्या घरी जाते, असा आरोप अनिल परब यांनी केला. यावेळी त्यांनी दलालांची नावे वाचून दाखवली. दलाल आकीद मुकादम, राज्यमंत्र्यांचा माणूस आहे. बिपीन पाटणे, संजय कदम हे सर्व महसूल राज्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत, असे सांगत त्यांनी ड्रोनने काढलेले फोटो तसेच निवडणुकीतील फोटो सभागृहात दाखवले.

गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

कांदिवली डान्सबारची बातमी बाहेर जाऊ नये म्हणून आता तो डान्सबार तोडून टाकला आहे. मात्र, मी स्वतः जाऊन बघून आलो. अवैध वाळू उपसा आणि डान्स बार परमिटप्रकरणी मी केलेले आरोप हे पुराव्यानिशी केले आहेत. सभागृहात पुरावे दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकरणी गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी अनिल परब यांनी केली.

आरोपात तथ्य असेल तर त्यावर विचार करू - फडणवीस

यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या आरोपांवेळी मी सभागृहात नव्हतो. नंतर त्यांच्याकडून समजून घेईन आणि त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर त्यावर विचार केला जाईल.

logo
marathi.freepressjournal.in