
काही दिवसांपूर्वी वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत कारवाई केली होती. यावरुन ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी या कारवाईवरुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. आज ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या मोर्च्यात बोलताना परब यांनी हा दम दिला आहे.
यावेळी बोलाताना त्यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला. बाळासाहेबांचा वारसा आणि विचार घेऊन चाललो असल्याचं शिंदे सरकार सांगतं. पण बाळासाहेबांची प्रतिमा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या शाखेला अधिकाऱ्यांनी हात लावला आहे. यावर शिंदे सरकार काय कारवाई करतंय. त्यांनी यावर कारवाई केली नाही तर त्यांनी बाळासाबेबांचं नाव घेण बंद करावं, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणीही उठतो आणि शाखेवरुन तक्रार करतो. महापालिकेचे लोक येऊन कारवाई करतात. उद्यापासून त्यांची कॉलर पकडून वांद्रे विभागात त्यांना फिरवतो आणि कुठेकुठे अनधिकृत बांधकामे झाली आहेत ते दाखवतो असं ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पोलिसांच्या बळावर आमच्याशी लढू नका. आमचं भांडण पोलिसांशी नाही. पण पोलिसांनी निष्पक्षपणे काम केलं पाहिजे. अजूनही मी आमदार आहे हे लक्षात ठेवा असा दम परब यांनी दिला आहे.
सांताक्रूझ येथे निर्माण झालेल्या पाण्याच्या समस्येवर ठाकरे गटाकडून मुंबई पालिकेच्या एच पूर्व विभागात आज मोर्चा काढला. अनिल पबर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केलं. यावेळी बोलताना त्यांनी पाण्याचा प्रश्न न सुटल्यास अधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. तसंच यावेळी त्यांनी गटारं साफ झाली नाहीत, कचरा उचलला नाही तर लोकांना त्रासाला सामोरे जावं लागेल. असं म्हणत आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली असं जाहीर करत असल्याचं परब यांनी सांगितलं.